Donald Trump Shooting Reaction confirms no prior intelligence warning was received before the White House Correspondents Dinner attack : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित असलेल्या हॉलच्या बाहेर गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स असोसिएशनच्या डिनरदरम्यान झालेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. गोळीबारास सुरूवात होताच उपस्थितांनी जीव वाचवण्यासाठी टेबलांखाली आश्रय घेतला, तर ‘सिक्रेट सर्व्हिस’च्या जवानांनी ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले.

या घटनेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, सीएनएनच्या पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, त्यांना किंवा त्यांच्या टीमला या हल्ल्याबाबत आधीच काही धोक्याची सूचना मिळाली होती का? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की , गोळीबार होण्यापूर्वी त्यांना किंवा त्यांच्या टीमला कोणत्याही प्रकारच्या धोक्याची पूर्वसूचना मिळाली नव्हती. “नाही, आम्हाला याबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि कोणतीही सूचना देण्यात आलेली नव्हती,” असे ट्रम्प म्हणाले.

व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर गोळीबाराच्या घटनेत आपणच लक्ष्य होतात का असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, “मला तसे वाटते, म्हणजे हे लोक वेडे आहेत. आणि काही सांगता येत नाही, तो माझ्यापासून खूप दूर होता, त्याला खूप अडथळे पार करावे लागले असते. आमची रिसोर्सेस सर्वत्र होते, काही वेशांतर करून पाहुण्यामध्ये बसलेले होते.”

दरम्यान गोळीबार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना व्यासपीठावरून तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. गोळीबार करणारा व्यक्ती कॅलिफोर्नियातील ३१ वर्षीय कोल टॉमस ॲलन असल्याचे सांगितले जात आहे. ज्या हॉटेलमध्ये डिनरचे आयोजन करण्यात आले होते त्याच वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये राहत होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले असून, सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर दोन तासांनी ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संपूर्ण घटनेबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ट्रम्प यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोर हा सुरक्षा बॅरिकेड्स ओलांडताना दिसत आहे तर अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसचे एजंट त्याच्याकडे धावताना दिसत आहेत. या घटनेत एका अधिकाऱ्याला गोळी लागल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, त्या अधिकाऱ्याने बुलेट-रेझिस्टंट व्हेस्ट घातलेले होते, ज्यामुळे अधिकाऱ्याचा जीव बचावला आहे.