भारतीय वंशाच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नवनेथम उर्फ नावी पिल्ले यांना २०२६ चे शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “मी जगात आठ मोठी युद्धे रोखली, त्यामुळे मला एक नव्हे तर आठ नोबेल पारितोषिकं मिळायला हवी होती,” असा दावा करत ट्रम्प यांनी नोबेल समितीसह पुरस्कार विजेत्या नवी पिल्ले यांच्यावर निशाणा साधला. ‘हिंदूस्तान टाइम्स’ ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
नावी पिल्ले या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिक असून २००८ ते २०१४ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी अधिकारविषयक उच्चायुक्त म्हणून काम केलं आहे. त्यामुळे ‘मी ८ युद्ध थांबवली’ असं म्हणत शांततेच्या नोबेल पारितोषिकावर दावा सांगणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची निराशाच झाली आहे. पाकिस्तानने याहीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शांततेच्या नोबेलसाठी शिफारस केली होती.
आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर लिहिलेल्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाचा विशेष उल्लेख केला. गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेला लष्करी तणाव मीच मध्यस्थी करून शांत केला, असा जुनाच दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. मात्र, भारताने ट्रम्प यांचा हा मध्यस्थीचा दावा यापूर्वीच अनेकदा फेटाळून लावला आहे.
“ज्या स्त्रीबद्दल कोणालाच माहिती नाही, तिला पुरस्कार का?”
ट्रम्प यांनी नावी पिल्ले यांचा फोटो शेअर करत लिहिले, “अमेरिकेचे प्रतिनिधित्व करताना मी आठ युद्धे थांबवली. तरीही नोबेल शांतता पुरस्कार अशा एका महिलेला देण्यात आला, जिच्याबद्दल मला किंवा जगातील इतर कोणालाही काहीच माहिती नाही. फक्त ती इस्रायलचा द्वेष करते, एवढीच तिची ओळख आहे. तिने शांततेसाठी नक्की काय काम केले आहे, हे कोणालाच ठाऊक नाही.”
जागतिक स्तरावर मानवी हक्क आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे रक्षण करण्यासाठी, तसेच युद्ध गुन्हे आणि नरसंहाराविरोधात दिलेल्या योगदानासाठी नॉर्वेजियन नोबेल समितीने नवी पिल्ले यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
ट्रम्प यांनी दावा केलेली ‘आठ युद्धे’ कोणती?
आपल्या कार्यकाळात शांतता प्रस्थापित केल्याचा दावा करताना ट्रम्प यांनी आठ वेगवेगळ्या संघर्षांची यादीच सादर केली आहे:
- भारत आणि पाकिस्तान
- इस्रायल आणि इराण
- इस्रायल आणि हमास
- कंबोडिया आणि थायलंड
- कोसोवो आणि सर्बिया
- काँगो आणि रवांडा
- इजिप्त आणि इथिओपिया
- आर्मेनिया आणि अझरबैजान
याशिवाय, लवकरच रशिया-युक्रेन आणि अमेरिका-इराण यांच्यातील तणाव मिटवून आणखी दोन युद्धे थांबवणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
“मी इतिहासात सर्वाधिक जीव वाचवले”
आपल्या योगदानाचा पाढा वाचताना ट्रम्प पुढे म्हणाले, “मी इतिहासातील कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचवले आहेत. इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखले, ज्यामुळे संपूर्ण मध्य पूर्व उद्ध्वस्त होण्यापासून वाचले.”
त्यांनी पुढे नमूद केले की, हमासच्या तावडीतून २८ इस्रायली बंधकांची सुटका करणे, व्हेनेझुएलाचे हुकूमशहा निकोलस मादुरो यांना हटवणे आणि जगभरातून विनामोबदला शेकडो ओलीस आणि राजकीय कैद्यांना सुरक्षित घरी आणणे, ही माझी मोठी यशगाथा आहे.
“नोबेल पुरस्काराची प्रतिष्ठा आता संपली”
संयुक्त राष्ट्रांवर आणि नोबेल समितीवर थेट हल्ला चढवत ट्रम्प म्हणाले, “मी ही सर्व युद्धे सोडवताना संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली नाही, कारण त्यांचा काहीही उपयोग नव्हता. तरीही हा पुरस्कार संयुक्त राष्ट्रात काम करणाऱ्या एका डाव्या विचारसरणीच्या व्यक्तीला देण्यात आला.”
https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/117414533410378018
“हा निर्णय म्हणजे इतिहासातील एक कधीही न पुसला जाणारा डाग आहे. लोकशाहीविरोधी आणि संस्कृतीचे शत्रू असलेल्या काही कट्टरपंथीयांमुळे नोबेल शांतता पुरस्काराचे महत्त्व आणि प्रतिष्ठा आता कायमची संपली आहे,” अशा जळजळीत शब्दांत ट्रम्प यांनी आपला राग व्यक्त केला.
