Trump us India trade deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापाराबद्दल मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत यांच्यामधील व्यापार करारात पोषक बदल केले आहेत ज्याचा फायदा दोन्ही देशातील व्यापाराला होणार आहे. २०२५ च्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क लावले होते. त्यानंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापारावर मोठा परिणाम झाला होता. आता हे आयात शुल्क कमी करून १८ टक्क्यांवर आणले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती दोन्ही देशाच्या प्रमुखांनी दिली आहे. आयात शुल्कात घट केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आहे.

रशियासोबतच्या व्यापारामुळे आक्षेप

पाच महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% टॅरिफ लादला होता. भारतात रशियाकडून होत असलेल्या कच्च्या तेलाच्या आयातीवर अमेरिकेने आक्षेप घेत आयात शुल्कात वाढ केली होती. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार दावा केला होता की, भारताने रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे रशियाला युद्धात आर्थिक मदत झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’द्वारे नव्या व्यापार कराराची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, “आज माझे राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी बोलणे झाले. यावेळी त्यांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आता १८% आयात शुल्क आकारले जाईल असे सांगितले. या घोषणेबद्दल भारतातील १.४ अब्ज लोकांच्या वतीने राष्ट्रपती ट्रम्प यांचे खूप-खूप आभार. जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात तेव्हा ते आपल्या लोकांना फायदेशीर ठरते आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध होते. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व महत्त्वाचे आहे. भारत शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देतो. आमची भागीदारी अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये व्यापार कराराबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे होते. पण यातील बऱ्याच मुद्द्यांवर भारताकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. ट्रम्प यांनी सांगितलेले मुख्य ७ मुद्दे :

१. भारत अमेरिकेच्या निर्यातीवरील कर शून्यावर आणेल.

२. अमेरिका परस्पर कर (रेसिप्रोकल टॅरिफ) २५% वरून १८% पर्यंत कमी करेल.

३. ट्रम्प यांनी दावा केला की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल.

४. भारत अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवेल.

५. भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात करू शकतो.

६. ट्रम्प म्हणाले की भारताने ऊर्जा, शेती, कोळसा आणि तंत्रज्ञानासह अनेक अमेरिकन वस्तूंवर ५०० अब्ज डॉलर्सची खरेदी करण्याचे वचन दिले आहे.

७. ट्रम्प यांनी दावा केला की हा करार रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यास मदत करेल.