अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारतावरील टॅरिफ कमी करत असल्याची घोषणा केली आहे. आता हे शुल्क २५ टक्क्यांऐवजी १८ टक्के असेल आणि त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने लागू होईल, असेही ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. मात्र, केंद्र सरकारने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबरोबर एका व्यापारी कराराची घोषणा केली आहे. या करारानुसार भारतीय वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात दीर्घ काळापासून असलेला तणाव अखेर कमी झाला आहे.
या ५० टक्के करामध्ये २५ टक्के रेसिप्रोकल टॅरिफ आणि भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यामुळे लावलेल्या २५ टक्के अतिरिक्त टॅरिफचा समावेश होता. नव्या करारानंतर अमेरिकेने हा अतिरिक्त दंड काढून टाकला असून करही कमी केला आहे.
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, अमेरिकेने रशियन तेलाच्या आयातीशी संबंधित दंडात्मक कर काढून टाकला आहे, आणि फक्त सुधारित रेसिप्रोकल टॅरिफ तेवढेच ठेवण्यात आले आहे.
नव्या टॅरिफ स्ट्रक्चरमुळे भारताला या प्रदेशातील इतर निर्यातदार देशांच्या तुलनेत अधिक फायदा मिळणार आहे. इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनामच्या तुलनेत भारतासाठी टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. तसेच, चीन आणि पाकिस्तानच्या तुलनेत देखील भारतीय मालावर लादलेले टॅरिफ अत्यंत कमी झाले आहे.
इतर देशांवर किती टॅरिफ
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, भारतावरील टॅरिफ आता १८ टक्के करण्यात आल्याने भारत आपल्या अनेक प्रादेशिक आणि जागतिक स्पर्धकांच्या तुलनेत अत्यंत मजबूत स्थितीत जाऊन पोहचला आहे. आता भारताच्या तुलनेत अमेरिकेकडून चीन, पाकिस्तान, बांगलादेश अशा इतर देशांच्या मालावर अधिक टॅरिफ लादले जात आहे.
जास्त टॅरिफ असलेले देश
चीन – ३७ टक्के
ब्राझील- ५० टक्के
दक्षिण अफ्रिका – ३० टक्के
म्यानमार – ४० टक्के
लाओस – ४० टक्के
कमी टॅरिफ असणारे देश
युरोपियन यूनियन – १५ टक्के
जपान – १५ टक्के
दक्षिण कोरिया – १५ टक्के
स्वित्झर्लंड – १५ टक्के
युनायटेड किंग्डम – १० टक्के
साऊथ इस्ट आशियामधील देशांवर किती टॅरिफ?
बांगलादेश – २० टक्के
व्हिएतनाम – २० टक्के
मलेशिया – १९ टक्के
कंबोडिया – १९ टक्के
थायलंड – १९ टक्के
पाकिस्तान – १९ टक्के
ट्रम्प यांच्याकडून टॅरिफ कमी केल्याची घोषणा
ट्रम्प यांनी दावा केला आहे की, टॅरिफमध्ये कपात केल्याच्या बदल्यात भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे मान्य केले आहे. तसेच, भारत अमेरिकेकडून विविध क्षेत्रांमध्ये ५०० अब्ज डॉलरची खरेदी करणार असल्याचेही ट्रम्प यांनी जाहीर केले. याबरोबरच भारत अमेरिकेवरील टॅरिफ कमी करत करत शून्यापर्यंत आणेल असेही त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी लिहिले आहे की, “आम्ही व्यापार आणि युक्रेन-रशिया युद्धसमाप्तीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करण्याचे आणि अमेरिकेकडून, तसेच व्हेनेझुएलाकडून जास्त तेल खरेदी करण्याचे मान्य केले आहे. यामुळे युक्रेनमधील युद्ध थांबवणे शक्य होईल.” पंतप्रधान मोदींबद्दल आपल्याला आदर वाटतो, त्यामुळे त्यांच्या विनंतीवरून भारताबरोबर व्यापार करार करण्याचे मान्य केले असल्याचेही ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर लिहिले आहे.
“पंतप्रधान मोदी यांनी आणखी मोठ्या प्रमाणात अमेरिकी वस्तू खरेदी करण्याचेही मान्य केले आहे. भारत अमेरिकेकडून ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा आणि इतर क्षेत्रांमध्ये ५०० अब्ज डॉलरपर्यंत खरेदी करेल,” असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

