Jairam Ramesh On Narendra Modi : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील तहशतवादी तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटला होता. मात्र, हा संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेकदा केला. पण ट्रम्प यांचा हा दावा भारताने पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे.

यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपण भारत-पाकिस्तान संघर्ष रोखल्याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. यातच भारत आणि अमेरिकेत व्यापार करार आणि टॅरिफच्या मुद्यांवरून तणाव आहे. असं असताना आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष आपण रोखल्याचा पुनरुच्चार केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पुनरुच्चारानंतर काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. ‘पंतप्रधान मोदींचे वॉशिंग्टन डीसीमधील (डोनाल्ड ट्रम्प) चांगले मित्र ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी हस्तक्षेप केल्याचा दावा सांगून शतकाच्या टप्प्यावर आहेत. मात्र, तरीही याबाबत पंतप्रधान मोदी हे पूर्ण मौन बाळगून आहेत’, असं म्हणत जयराम रमेश यांनी हल्लाबोल केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काय म्हटलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की, ‘आपण भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखलं. अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. माझ्या पहिल्या कार्यकाळात मी सैन्याला पूर्णपणे सक्रिय केलं. मी जगभरातील अनेक देशांमधील भारत-पाकिस्तान, इराण-इस्रायल आणि रशिया-युक्रेन यांच्यातील अणुयुद्धे रोखली आहेत.”

९० पेक्षा जास्त वेळा ट्रम्प यांनी केला दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ९० पेक्षा जास्त वेळा भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष आपण संपवल्याचा दावा केला. ट्रम्प यांनी गेल्या वर्षी १० मे रोजी सोशल मीडियावर पहिल्यांदा घोषणा करत म्हटलं होतं की अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तान लष्करी संघर्ष तात्काळ थांबवत आला. मात्र, भारताने नेहमीच कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला सातत्याने नकार दिलेला आहे.