Donald Trump on India-Pakistan Conflict: पहलगाम हल्ला व त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत व पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राईक यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. भारतानं पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांसोबतच पाकिस्तानच्या काही हवाई तळांवरही हल्ले केले. यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रविरामाची झालेली विनंती भारतानं मान्य केली. पण आपणच दोन्ही देशांमधलं युद्ध थांबवलं, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेव्हा केला होता. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

एकीकडे इस्रायल-इराण यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याची जोरदार तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी चालवली असतानाच भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा करायला ते विसरले नाहीत. मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टनमध्ये प्रसारमाध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आंतरराष्ट्रीय स्थितीबाबत विचारणा केली. तेव्हा ट्रम्प यांनी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली.

मला पाकिस्तान आवडतो – डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची भेट घेतली. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता आपल्याला पाकिस्तान आवडतो, असं विधान ट्रम्प यांनी केलं. “मला पाकिस्तान आवडतो. पण मोदी एक खूप चांगले व्यक्ती आहेत. मी काल रात्री त्यांच्याशी बोललो. आम्ही लवकरच भारताशी करार करणार आहोत”, असं ट्रम्प म्हणाले.

“दोन अण्वस्त्रधारी देशांमधील युद्ध मी थांबवलं”

“मी भारत व पाकिस्तान यांच्यातल युद्ध थांबवलं. आसीम मुनीर पाकिस्तानच्या बाजूने प्रभावीपणे काम करत होते. भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काम करत होते. याशिवाय इतरही लोक प्रयत्न करत होते. त्या दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष पेटला होता. शिवाय ते दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहेत. मी ते थांबवलं. मी दोन मोठ्या अण्वस्त्रधारी देशांमधलं युद्ध थांबवलं. मला वाटत नाही मी यावर फार काही लिहिलेलं नाही. पण हरकत नाही. लोकांना माहिती आहे”, असा दावा ट्रम्प यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका

दरम्यान, याआधी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान भारताची भूमिका स्पष्ट केली होती. “ऑपरेशन सिंदूर हे शस्त्रविरामापर्यंत गेलं पण त्यात अमेरिकेची मध्यस्थी नव्हती, यापुढेही नसेल. भारत आणि अमेरिका व्यापार विषयक संबंध किंवा अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करणं याबाबत काहीही चर्चा झाली नव्हती. भारताने आधीही अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली नव्हती यापुढेही कधीच स्वीकारणार नाही”, असं मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट केलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.