Donald Trump Iran News updates : अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू केलं असून संयुक्तपणे हल्ले सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, इराण आता चर्चा करण्याकरता पुढे आली असून चर्चेची दारे अमेरिकेने बंद केले आहेत. याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायलने तेहरानवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणचे नेतृत्व चर्चा करू इच्छित आहे. पण आता खूप उशीर झालाय असं अमेरिकेने सांगितलं. ट्रम्प पुढे म्हणाले की, इराणचे हवाई संरक्षण, हवाई दल, नौदल आणि नेतृत्व आता संपले आहे.” तसंच, इराणविरोधातील युद्धात चार ते पाच आठवडे टिकून राहण्याची अमेरिकेची क्षमता असल्याचंही ते म्हणाले.

‘अँटलांटिक मॅगझिन’ला रविवारी दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “त्यांना चर्चा करायची आहे आणि मी देखील चर्चेसाठी तयार झालो आहे, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलेन. पण त्यांनी हे आधीच करायला हवे होते. जे व्यावहारिक आणि सोपे होते, ते त्यांनी आधीच मान्य करायला हवे होते. त्यांनी खूप उशीर केला.”

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वी ‘न्यू यॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, इराणविरोधात हवाई हल्ले होत असताना आता जमिनीवरील लढाई सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिलेत. येत्या काळात लष्कर पाठवण्याची शक्यता असल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. “प्रत्येक राष्ट्राध्यक्ष जसे म्हणतात की, आमचे सैन्य प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरणार नाही. पण मी म्हणेन की मला त्याची गरज भासणार नाही, आणि जर भासलीच तर मागेही हटणार नाही, असं मी म्हणेन”, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

४९ वरिष्ठ इराणी नेत्यांचा खात्मा

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी अधिकृत घोषणा केली की, तेहरानवर झालेल्या अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये “इराणच्या राजवटीतील ४९ सर्वात वरिष्ठ नेत्यांचा” खात्मा करण्यात आला आहे. “दहशतवाद्यांना मारणे हे अमेरिकेसाठी हिताचे आहे,” असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.