Donald Trump Renames AI To SI : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांच्या कालावधीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. वादग्रस्त इमिग्रेशन पॉलिसी, H-1B व्हिसा, आयात शुल्क, इराण युद्ध अशा अनेक मुद्यांचा यामध्ये समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे वक्तव्य करतात आणि चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील काही प्रमुख प्रसारमाध्यमे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला होता. या सर्व घडामोडीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ‘एआय’चं नाव बदललं असून नव्या नावाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी एआय (AI) चं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत अनेक उद्योगपती सहभागी झालेले होते.
‘एआय’चं नाव आता ‘एसआय’ (SI) असं करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्या अनुषंगाने ट्रम्प यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली असून आता अमेरिकेच्या प्रशासनात ‘एआय’चं नाव अधिकृतपणे बदलून ‘एसआय’ (सुपर इंटेलिजन्स) असं करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या शब्दाऐवजी ‘सुपर इंटेलिजन्स’ हा शब्द तंत्रज्ञानाची खरी ताकद आणि क्षमता अधिक प्रभावीपणे दर्शवत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच ‘एआय’चं नाव बदलण्याच्या आणि नव्या नावाच्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी देखील केली आहे. त्यामुळे आता ‘एआय’ हे ‘एसआय’ या नावाने ओळखलं जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
एआयचं नाव बदलण्याच्या निर्णयाबाबत ट्रम्प यांनी म्हटलं की, “आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नाव बदलण्यासाठी एका प्रस्तावावर मी स्वाक्षरी करत आहे. कारण ते कृत्रिम नाही आणि यावर आम्ही सर्व सहमत आहोत. आता आम्ही ‘एआय’चं नाव बदलून ‘एसआय’ म्हणजे ‘सुपर इंटेलिजन्स’ ठेवणार आहोत. ही कदाचित आतापर्यंतची सर्वात मोठी गोष्ट असेल. इंटरनेटपेक्षाही कितीतरी पटीने मोठी. आपल्या देशासाठी ही एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे आणि ती सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे”, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
