अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच एपस्टीन फाईल्सची नवीन बॅच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यानंतर अखेर या प्रकरणावर ट्रम्प यांनी आपले मौन सोडले आहे.
न्याय विभागाने एपस्टीन फाईल्समधील ३० लाखांहून अधिक पाने प्रसिद्ध केल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना, ही कागदपत्रे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमधून त्यांना मुक्त करतात असे सांगितले.
फ्लोरिडाला जात असताना विमान प्रवासादरम्यान माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की, “मी स्वत:हून ते (एपस्टीन फाईल्स) पाहिलेले नाही, पण मला काही अत्यंत महत्त्वाच्या लोकांनी सांगितले आहे की, ते फक्त मला मुक्तच करत नाही, तर कट्टर डाव्या विचारसरणीचे लोक जी अपेक्षा ठेवून होते, त्याच्या एकदम उलट आहे.”
विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, नुकतेच उघड करण्यात आलेल्या या कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख ३ हजारपेक्षा जास्त वेळा करण्यात आला आहे. असे असले तरी न्याय विभागाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा बचाव केला आहे. तसेच एपस्टीन फाईल्समधील काही कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्याविरोधात खोटे आणि सनसनाटी दावे करण्यात आले असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळत डिपार्टमेंटने म्हटले आहे की, “काही कागदपत्रांमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात खोटे आणि सनसनाटी दावे करण्यात आलेले आहेत, जे की २०२० निवडणुकीच्या तोंडावर एफबीआयकडे सादर करण्यात आले होते. “
“स्पष्ट सांगायचे झाल्यास, हे दावे निराधार आणि खोटे आहेत आणि जर या दाव्यांमध्ये जराही सत्यता असती तर नक्कीच यापूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात याचा वापर करण्यात आला असता,” असे न्याय विभागाने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्यावरील आरोप
एफबीआयने गोळा केलेल्या नवीन कागदपत्रांमध्ये, एफबीआयच्या नॅशनल थ्रेट ऑपरेशन्स सेंटर हॉटलाईनच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात आरोप करण्यात आले आहेत, असे वृत्त द गार्डियनने दिले आहे.
रिपोर्टमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेले अनेक आरोप हे पुरावा नसलेले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, जेफ्री एपस्टीन आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती यांच्याशी संबंधित लैंगिक शोषणाबाबतचे दावे असल्याचे दिसून आले आहे.
न्याय विभागाच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या फाईल्समध्ये एपस्टीनची माउंटबॅटन-विंडसर यांच्याशी असलेली मैत्री, आणि ट्रम्प यांचे सल्लागार स्टीव्ह बॅनन, न्यूयॉर्क जायंट्सच्या मालकांपैकी एक स्टीव्ह टिश्च आणि इतरांबरोबरचे ईमेलवरील संवाद यांचा समावेश आहे. जेफ्री एपस्टीन हा एक लैंगिक गुन्ह्यांमधील दोषी होता, त्याने २०१९ मध्ये न्यूयॉर्क सिटी तुरूंगात आत्महत्या केली.

