वॉशिंग्टन : क्युबाला रशियाकडून तेलपुरवठा केला जात असेल, तर त्याला आपली हरकत नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सांगितले. अमेरिकेने क्युबावर लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना कच्च्या तेलाची खरेदी करणे कठीण झाले आहे. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून क्युबामध्ये वारंवार विद्युतपुरवठा दीर्घकाळ खंडित होण्याच्या घटना झाल्या आहेत.
ट्रम्प रविवारी वॉशिंग्टनला परतत असताना विमानात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “एखाद्या देशाच्या जहाजातून क्युबाला तेलपुरवठा केला जात असेल तर आमची हरकत नाही. त्यांना जगण्यासाठी त्याची गरज आहे.” तेलपुरवठा करणारा देश रशिया असला तरी फरक पडत नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. मानवातावादी मदत म्हणून अनातोली कोलोदकिन जहाजातून क्युबाच्या मातान्झस बेटावर सुमारे ७.३० लाख पिंपे तेल पाठवल्याचे रशियाच्या वाहतूक मंत्रालयाने सोमवारी सांगितले. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका, युरोपीय महासंघ आणि ब्रिटनने या जहाजावर निर्बंध घातले आहेत.
