Donald Trump says he will permanently pause migration from third world countries : अमेरिकेत व्हाईट हाऊसच्या बाहेर एका संशयित स्थलांतरिताने केलेल्या गोळीबारात एका सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन स्थलांतरितांबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या स्थलांतर धोरणात मोठे बदल करण्याची घोषणा केली. यावेळी ट्रम्प यांनी त्यांचे प्रशासन तिसऱ्या जगातील म्हणजेच थर्ड वर्ल्ड देशांमधून होणारे स्थलांतर कायमचे थांबवण्यासाठी काम करेल असे सांगितले आहे.

एका दिवसापूर्वी व्हाईट हाऊसच्या जवळ एका अफगाण नागरिकाने दोन नॅशनल गार्ड सैनिकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर सरकारने म्हटले की, ते अफगाणिस्तानसह १९ देशांमधील स्थलांतरितांच्या पर्मनंट रेसिडेन्सी स्टेटसचा आढावा घेईल.

ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

“मी अमेरिकेची व्यवस्था पूर्णपणे रिकव्हर होऊ देण्यासाठी सर्व तिसऱ्या जगातील (थर्ड वर्ल्ड) देशांमधून होणारे स्थलांतर कायमचे थांबवेन, बायडन यांनी दिलेले लक्षावधी बेकायदेशीर प्रवेश रद्द करेल, ज्यामध्ये झोपेला आलेल्या जो बायडेन यांच्या ऑटोपेनने स्वाक्षरी केलेल्यांचाही समावेश असेल, आणि जे अमेरिकेसाठी नेट असेट नाहीत, किंवा जे आपल्या देशावर प्रेम करू शकत नाहीत, अशा सर्वांना बाहेर काढेन, तसेच आपल्या देशाचे नागरिक नसलेल्यांचे सर्व फेडरल लाभ बंद करेन, देशातील शांतता बिघडवणाऱ्या स्थलांतरितांचे नागरिकत्व काढून टाकेन, आणि सरकावर अवलंबून असलेल्या, सुरक्षेला धोका किंवा पाश्चिमात्य संस्कृतीशी जुळवून घेऊ न शकणाऱ्या विदेशी नागरिकांना देशातून काढून टाकेन,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

गुरूवारी एका अफगाण स्थलांतरिताने व्हाईट हाऊसच्या जवळ दोन नॅशनल गार्ड सैनिकांवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याच्या एक दिवसानंतर ट्रम्प यांनी एक मोठी सोशल मीडिया पोस्ट लिहीली आहे, ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, “हे स्थलांतरितांचे ओझे अमेरिकेत सामाजिक अनागोंदीचे कारण ठरत आहेत, जे दुसऱ्या महायुद्धानंतर नव्हते.” त्यांनी पुढे दावा केला की, “आपण तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगती जरी केली, तर इमिग्रेश पॉलसीमुळे त्या लाभांची आणि अनेकांच्या राहणीमानाची स्थिती ढासळली आहे “