Donald Trump on Tariff Talks with India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी भारताबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की “आयात शुल्काबाबत (टॅरिफ) आमची भारताशी सकारात्मक चर्चा चालू असून ती उत्तम पद्धतीने पुढे सरकत आहे. त्यामुळे मला वाटतंय की दोन्ही देशांची एका करारावर सहमती होईल.” जागतिक व्यापाराच्या क्षेत्रावर मळभ दाटलेलं असताना ट्रम्प यांनी केलेलं हे वक्तव्य भारतासाठी एक उत्तम संधी असल्याचं बोललं जात आहे. याचे उभय देशांमधील व्यापारावर चांगले परिणाम होऊ शकतात.
ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लागू केल्यानंतर वैश्विक बाजारावर त्याचे गंभीर पडसाद उमटले. भारतासह अनेक देशांचे शेअर बाजार गडगडले. यामुळे देशांतर्गत उत्पादनावर परिणाम होईल असं दिसत असतानाच ट्रम्प यांच्या या वक्तव्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. तसेच ट्रम्प ऑटोमोबाइल्स व वाहन निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांवरील आयात शुल्कात २५ टक्के सूट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठीच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प स्वाक्षरी करू शकतात.
ऑटोमोबाइल क्षेत्राला गूड न्यूज मिळण्याची शक्यता
वाहन उत्पादक व खासगी विश्लेषकांनी व्हाइट हाऊसच्या निदर्शनास आणून दिलं होतं की या आयात शुल्कवाढीच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेच्या तुलनेत अमेरिकेतील वाहनांच्या किंमती वाढू शकतात आणि विक्री कमी होऊ शकते. परिणामी उत्पादन घटू शकतं. त्यामुळे ट्रम्प प्रशासन ऑटोमोबाइल क्षेत्रावरील आयात शुल्कात सूट देऊ शकतं. मात्र, चिनी कंपन्या, उत्पादक व सुट्या भागांच्या चीनमधील पुरवठादारांना यातून सूट मिळणार नाही. यावर १४५ आयात शुल्क लागू असेल.
व्हाइट हाऊसकडून अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “वाहन उत्पादकांना देशांतर्गत उत्पादन वाढवणे, अधिक नोकऱ्या निर्माण करण्यास ससक्षम करणे ही आपली प्रमुख उद्दीष्ट्ये आहेत. आपले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच देशांतर्गत व परदेशी वाहन उत्पादक कंपन्यांमधील वरिष्ठांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या कंपन्यांसमोर सरकारचं धोरण स्पष्ट केलं. अमेरिकेत वाहन उत्पादन परत आणण्यासाठी हे सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी कंपन्यांना सांगितलं. या कंपन्यांनी देखील त्यास अनुकूलता दर्शवली आहे.