Donald Trump speech on Iran War: इराण युद्धाचा शेवट आला आहे, असे वाटत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चमत्कारीक विधान करतात किंवा थेट इराणवर हल्ला करतात. नुकतेच त्यांनी अमेरिकन जनतेला संबोधित करत इराण युद्धाची माहिती दिली. हे युद्ध दोन ते तीन आठवड्यात संपणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही इराणला अश्मयुगात पोहोचवूनच हे युद्ध थांबवू, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी अमेरिकेने इतिहासात लढलेली युद्धे, त्यांचा कालावधी आणि इराण युद्धाचा कालावधी याचीही तुलना केली.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इराण युद्धादरम्यान अमेरिकेची मुख्य सामरिक उद्दिष्टे पूर्ण होण्याच्या जवळ आली आहेत. अमेरिकन सैन्य लवकरच इराणमधील आपले काम फत्ते करेल.” पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यानंतर जगभरात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. या ऊर्जा संकटानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदाच राष्ट्राला उद्देशून भाषण केले.

१३ अमेरिकन सैनिक ठार

इराण युद्धात अमेरिकेचे अल्पकालीन नुकसान झाले असल्याकडेही ट्रम्प यांनी लक्ष वेधले. या युद्धात १३ अमेरिकन सैनिक ठार झाले. याकडे अमेरिकन लोकांनी एक गुंतवणूक म्हणून पाहावे, असेही ते म्हणाले. इराणमधील कारवाई सहा आठवड्यात संपत आहे, असे सांगून ट्रम्प यांनी भूतकाळात झालेल्या युद्धांची यादी आणि ते किती काळ चालले, याची माहिती दिली.

पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा सहभाग एक वर्ष, सात महिने आणि पाच दिवस होता. दुसऱ्या महायुद्धात तीन वर्ष, आठ महिने आणि २५ दिवस अमेरिका सहभागी होती. कोरियन युद्ध तीन वर्ष, एक महिना आणि दोन दिवस चालले. व्हिएतनाम युद्ध १९ वर्ष, पाच महिने आणि २९ दिवस चालले. इराक युद्ध आठ वर्ष, आठ महिने आणि २८ दिवस चालले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

याउलट इराण युद्ध केवळ ३२ दिवस चालले असून याकाळात अमेरिकेने इराणची लष्करी क्षमता उध्वस्त केली आहे. आता इस्लामिक राजवटीकडून कोणताही मोठा धोका राहिलेला नाही, असे ट्रम्प यांनी निदर्शनास आणून दिले.

मात्र ट्रम्प यांच्या कोणत्याही विधानावर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न निर्माण होतो. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी आजवर वारंवार भूमिका बदलली आहे. कधी ते युद्ध लवकर संपू शकते, असे म्हणतात. तर कधी ते युद्ध आणखी भडकण्याची धमकी देतात. एकीकडे युद्धविरामासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे मध्यपूर्वेत हजारो अमेरिकन सैनिक तैनात केले जात आहेत.