Donald Trump Iran Ceasefire Nuclear Program Warning: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा संपूर्ण विनाश करण्याची धमकी दिल्यानंतर पुढच्या दहा तासात दोन आठवड्याच्या युद्धविरामाची घोषणा केली. इराणनेही १० अटी मान्य झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ट्रुथ सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी संघर्ष थांबला असून इराणबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तसेच इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम बिलकूल सुरू होऊ देणार नाही, असे ठामपणे सांगितले.

आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले की, इराणविरोधातील संघर्ष आता थांबला असून भविष्यात आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र काम करू. आमच्यात बऱ्याच बाबतीत एकमत झाले आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “इराणवरील टॅरिफ कमी करून त्यांच्यावरील निर्बंध मागे घेतले जातील. मात्र इराणला यापुढे युरेनियम समृद्ध करता येणार नाही. तसेच इराणमधील राजवट बदलत असून त्याचेही आम्ही स्वागत करू.”

US President Donald Trump posts on iran war
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची इराणबद्दल नवी भूमिका

युरेनियम समृद्ध करू देणार नाही

इराणने यापुढे युरेनियम समृद्ध करण्यास ट्रम्प यांनी विरोध केला आहे. तसेच इराणने जमिनीखाली लपवून ठेवलेले अण्वस्त्रासाठी लागणारे साहित्यही आम्ही शोधून काढू. तसेच यापुढे इराणवर कडक देखरेख केली जाईल आणि इराणच्या अणु सुविधांवर सतत पाळत ठेवली जाईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टमधील महत्त्वाचे मुद्दे कोणते?

  • इराणमध्ये आधीच राजवट बदलण्यास सुरुवात झाली आहे.
  • यापुढे युरेनियमचे समृद्धीकरण होणार नाही.
  • जमिनीखाली लपवून ठेवलेल्या आण्विक सामग्रीला काढण्यात अमेरिका मदत करेल.
  • इराणच्या आण्विक प्रकल्पावर अमेरिकेचे उपग्रहाद्वारे देखरेख असेल.
  • आयातशुल्क आणि इतर निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
  • १५ कलमी कार्यक्रमावर दोघांचेही एकमत झाले आहे.

इराणला शस्त्र पुरवणाऱ्या देशांना इशारा

इरणला ज्या देशांनी शस्त्र साठ्याचा पुरवठा केला, त्या देशांनाही ट्रम्प यांनी इशारा दिला आहे. ज्यांनी शस्त्र पुरवले त्या देशांवर तात्काळ टॅरिफ लादण्यात येत आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या त्यांच्या वस्तूंवर तात्काळ ५० टक्के टॅरिफ लादण्यात येत आहे. यात कोणताही बदल होणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी ट्रुथ पोस्टद्वारे दिला आहे.