Donald Trump Secret Plane Switch: इराणकडून मिळाणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्की दौऱ्यावर असताना गुप्तपणे विमान बदलल्याचे वृत्त समोर आले. यावर आता खुद्द ट्रम्प यांनी भाष्य केले असून, विमान बदलले असल्याची कबुली दिली आहे. ट्रम्प यांचा तुर्कीतील अंकारा विमानतळावरील केटरिंग ट्रकमध्ये बसून विमान बदलल्याचा व्हिडीओ समोर आला, त्यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले. द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी अमेरिकी हवाई दलाच्या सी-३२ए या विमानातून पुढील प्रवास केला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुप्तपणे बदलले विमान

समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, ‘डिकॉय’ म्हणजेच दिशाभूल करण्यासाठी वापरण्यात आलेले एअर फोर्स वन विमान पत्रकार आणि व्हाइट हाऊसच्या काही कर्मचाऱ्यांना घेऊन ठरलेल्या मार्गाने पुढे रवाना झाले. इराणकडून ट्रम्प यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. ट्रम्प यांची सुरक्षा लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कीतून विमान बदलण्याचा निर्णय सिक्रेट सर्व्हिसेसच्या सल्ल्यानुसार घेतल्याची माहिती ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

ट्रम्प काय म्हणाले?

“विमान बदलण्याचा निर्णय सीक्रेट सर्व्हिसने घेतला होता. मी फक्त पालन करतो. मी सिक्रेट सर्व्हिस आणि लष्कराच्या सूचनांनुसार वागतो. सुरक्षेच्या दृष्टीने ते तितकेच महत्वाचे होते”, असे डोनाल्ड ट्रम्प जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ट्रम्प यांना यावेळी धोक्याचे स्वरुप काय होते? याबाबत प्रश्न विचारण्यात आला, “मी त्याबाबत फार काही विचारले नाही. मला अनेक धमक्या येत असतात,” असे ट्रम्प म्हणाले.

प्रभावी राष्ट्राध्यक्ष असल्याचा दावा

“मला अशा अनेक धमक्या येत असतात. कोणत्याही प्रभावी राष्ट्राध्यक्षाला अनेक धमक्या मिळत असतात. फार महत्त्व नाही अशा राष्ट्राध्यक्षांना धमक्या मिळत नाहीत. पण, मला वाटते की, मी कदाचित सर्वाधिक प्रभावी राष्ट्राध्यक्ष आहे. जवळपास सहा वर्षांच्या कालावधीत माझ्याइतके काम कोणीही केलेले नाही,” असेही ट्रम्प पुढे म्हणाले. “खरं सांगायचं तर मला कशाचीही चिंता वाटत नाही”, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांना देखील नव्हती कल्पना

डोनाल्ड ट्रम्प यांनी विमान बदलले असल्याची कल्पना एअर फोर्स वनच्या दुसऱ्या विभागातून प्रवास करणाऱ्या पत्रकारांना देखील कल्पना नव्हती. माध्यम प्रतिनिधींना ट्रम्प यांच्याशी थेट संपर्काची परवानगी नव्हती. दरम्यान, ट्रम्प यांनी इराणवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेने संपूर्ण नियंत्रण मिळवले असल्याचा दावा केला आहे.