Donald Trump Viral Video Sex Comment: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या चमत्कारिक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. आखाती देशात युद्ध सुरू केल्यानंतर संबंध जग ऊर्जा संकटात सापडले असताना ट्रम्प मात्र युद्धाविषयी रोज नवनवीन विधाने करत असतात. भारत आणि पाकिस्तानमध्ये मे २०२५ रोजी झालेल्या संघर्षाबाबतही त्यांनी आजवर अनेक दावे केले असून कथित पाडलेल्या विमानांची संख्या, टॅरिफचा आकडा वाढत चालला आहे. आता तर त्यांनी फ्लोरिडा येथे गुंतवणूकदारांना संबोधित करत असताना तुम्ही मला कोणत्याही विषयावर प्रश्न विचारू शकता. अगदी सेक्सवरही विचारू शकता, असे म्हटले.
फ्लोरिडाच्या मियामी येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सौदी गुंतवणूकदारांच्या फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह या परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी गुंतवणूकदारांना उद्देशून म्हटले, “मी इतर राजकारण्यांसारखा नाही. तुम्ही मला कोणत्याही विषयावरील प्रश्न विचारू शकता. अगदी सेक्सबद्दलही तुम्ही मला विचारू शकता. मी कोणत्याही विषयावर बोलू शकतो.”
ट्रम्प यांच्या या चमत्कारिक विधानाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एपस्टीन फाइल्स प्रकरणात लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहेत. त्या दरम्यान त्यांनी लैंगिक विषयाचा उल्लेख आंतरराष्ट्रीय मंचावर केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेकजण ट्रम्प यांच्या या लहरी स्वभावावर सोशल मीडियावर टीका करत आहेत.
Trump:
— Megh Updates ?™ (@MeghUpdates) March 28, 2026
You can ask me anything you want. You can talk sex. Whatever the hell you want. pic.twitter.com/5zATt2A5lz
इराण युद्धावर केले मोठे भाष्य
याच परिषदेत बोलत असताना ट्रम्प यांनी आखाती प्रदेशातील युद्धावरही मोठे भाष्य केले. ते म्हणाले, आखाती प्रदेशातील देश आता इराणच्या अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या आणि दहशतवादाच्या सावटातून मुक्त होणार आहेत. त्यांनी म्हटले की, इराण एकेकाळी इतर देशांना धमकावत होता. मात्र आता त्यांची अवस्था हलाखीची झाली आहे. अमेरिकेचे लष्कर ऑपरेशन एपिक फ्युरीच्या माध्यमातून इराणचे कंबरडे मोडत आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला.
भारत-पाकिस्तान संघर्षावर पुन्हा नवीन विधान
भारत आणि पाकिस्तान संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी या संघर्षात कथितपणे पाडल्या गेलेल्या विमानांचा आकडा वाढवला आहे. यापूर्वी त्यांनी ५, ६, ७ आणि ८ विमाने पाडल्याचा दावा केला होता. यावेळी आता त्यांनी ९ विमाने या संघर्षात पाडली गेली, असे नवे विधान केले आहे. तसेच मी दोन्ही देशांवर २५० टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिल्याचेही ट्रम्प यांनी आता म्हटले आहे.
