अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतावर लादलेले २५ टक्के टॅरिफ काढून टाकण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या व्यापार कराराला दुजोरा दिला होता.
ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर घोषणा करताना ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत हा रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करेल. रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मुद्द्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. असे असले तरी पंतप्रधान मोदी यांच्याकडून ट्रम्प यांच्या घोषणेनंतर लगेचच करण्यात आलेल्या एक्स पोस्टमध्ये मात्र याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नव्हता.
दरम्यान ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यकारी आदेशात त्यांच्या या दाव्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे की, भारताने रशियाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात करणे थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. या आदेशात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, भारताने अमेरिकेकडून ऊर्जा उत्पादने खरेदी करण्याचेही मान्य केले आहे.
“विशेषतः, भारताने रशियन फेडरेशनकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तेल आयात करणे थांबवण्याचे वचन दिले आहे, तसेच अमेरिकेकडून युनायटेड स्टेट्स एनर्जी प्रॉडक्ट्स खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, आणि भारताने नुकतेच येत्या १० वर्षांसाठी संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिकेबरोबरच्या एका फ्रेमवर्कसाठी सहमती दर्शवली आहे,” असे या कार्यकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशामध्ये असेही म्हटले आहे की, वरिष्ठ अधिकार्यांकडून माहिती आणि शिफारसी मिळाल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी निश्चित केले की, भारताने कार्यकारी आदेश १४०६६ मध्ये स्पष्ट करण्यात आलेली राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक विषयांच्या मुद्द्यावर अमेरिकेशी पुरते जुळवून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकारी आदेशात स्पष्ट केले आहे की, भारतावरील २५ टक्के टॅरिफ हटवण्याचा हा निर्णय शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल.

