US Iran War Analysis: इराण युद्धाला एक महिना पूर्ण होण्याच्या निमित्ताने, किंवा कदाचित आणखी कोणत्या तरी कारणास्तव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ एप्रिल रोजी केलेले भाषण त्यांच्या प्रशासनाचे या कारवाईतील गोंधळलेपण मांडणारे ठरले. इराणमध्ये राजवट बदलाच्या उद्देशाने अमेरिका व इस्रायलने सुरू केलेली ‘मर्यादित लष्करी कारवाई’ अमर्याद सुरूच आहे आणि जगासमोर अनिश्चितताही वाढवत आहे.
इराण शरण तर आलेल नाहीच, उलट जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये १ टक्क्याहून कमी हिस्सा असलेल्या या देशाने जगातील २० टक्के खनिज तेलपुरवठा रोखून धरल्यामुळे जगातील लहान-मोठ्या अर्थव्यवस्थांची आर्थिक गणिते विस्कटू लागली आहेत. इराणला बेचिराख करू, अश्मयुगात धाडू वगैरे वल्गना करणाऱ्या ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच लष्करप्रमुखाची हकालपट्टी करण्याची नामुष्की ओढवली.
ट्रम्प भरकटले…
इस्रायल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारीच्या रात्री सुरू केलेल्या कारवाईच्या पहिल्या २४ तासांतच इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आणि खरे शासक अयातुल्ला अली खामेनी मारले गेले. नंतरच्या काळात अनेक वरिष्ठ लष्करी आणि राजकीय उच्चाधिकाऱ्यांचीही हत्या झाली. पण इराणकडून होणारा तिखट प्रतिकार अजिबात कमी झाला नाही. उलट समांतर विध्वंस (कोलॅटरल डॅमेज) या युद्धशास्त्रातील तत्त्वाचा अवलंब करून इराणने आजूबाजूच्या तेलसमृद्ध अरब देशांच्या अमेरिकी सामरिक आस्थापनांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यांची क्षेपणास्त्रे इस्रायलपर्यंतही सातत्याने पोहोचत आहेत. एकदा तर इराणने हिंद महासागरातील दिएगो गार्सिया या अमेरिकी तळाच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले. पण या सर्वांपेक्षाही अधिक परिणामकारक हत्यार इराणला गवसले. ते हत्यार म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनीची कोंडी.
जगातील २० टक्के खनिज तेल आणि जवळपास १५ टक्के नैसर्गिक वायूची वाहतूक या चिंचोळ्या जलमार्गावरून होते. तिची नाकेबंदी केल्यामुळे आशियातील अनेक देश इंधनटंचाईकडे ढकलले गेले आहेत. इराणकडून अशा प्रकारे विविध आघाड्यांवर तिखट प्रतिकार होऊ लागल्यामुळे ट्रम्प यांची गणिते बिघडली. त्यांनी इराणच्या तेलसाठ्यांवर हल्ले सुरू केल्यानंतर इराणनेही सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि कुवेत या अरब देशांच्या तेलप्रकल्पांवर, बंदरांवर हल्ले सुरू केले. ते पाहून अमेरिकेलाच आपला पवित्रा बदलावा लागला आणि ट्रम्प यांना इराणच्या ऊर्जा आस्थापनांवरील हल्ले स्थगित करावे लागले. अमेरिकेने यापूर्वी इराक, लिबिया, अफगाणिस्तान अशा देशांवर हवाई प्रभुत्व गाजवून त्यांना जवळपास पहिल्याच टप्प्यात नेस्तनाबूत केले होते. इराणच्या बाबतीत त्यांना सर्वस्वी वेगळा अनुभव येत आहे. गतवर्षी अमेरिकेने इस्रायलच्या मदतीने हवाई हल्ले करून इराणची हवाई संरक्षण प्रणाली जवळपास पूर्ण उद्ध्वस्त केली. ती कारवाई, तसेच या युद्धातील सुरुवातीच्या कारवाईनंतरही इराणने शरणागती पत्करलेली नाही हे ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यासाठी सर्वस्वी नवीन होते.
इराण उद्ध्वस्त तरी स्थिर
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इराणचे जवळपास १६००हून अधिक नागरिक मरण पावले. यात जवळपास अडीचशे लहान मुलांचा समावेश आहे. इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर, पायाभूत सुविधांवर, क्षेपणास्त्रे आणि शस्त्रनिर्मिती प्रकल्पांवर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनिशी हल्ले करण्यात आले. पण इराण हा विशाल देश असल्यामुळे आणि मोठा भाग डोंगर आणि वाळवंटांचा बनलेला असल्यामुळे सर्वच क्षेपणास्त्रे आणि त्यांचे निर्मिती प्रकल्प नष्ट करणे अमेरिका आणि इस्रायलसाठी जवळपास अशक्य आहे. शिवाय अशा प्रकारच्या दुहेरी हल्ल्यांसाठी इराणने अनेक वर्षे तयारी केली होती. विविध क्षमतेची आणि पल्ल्यांची क्षेपणास्त्रे, तसेच ड्रोन निर्मिती तेथे आजही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले जाते. ते सत्य असल्यास इराणला संपवणे किंवा शरण आणणे अमेरिकेसाठी जवळपास अशक्य आहे. कारण इराणच्या मारक क्षमतेत ऱ्हास होत नाही आणि आसपासच्या देशांना त्याच्यापासून असलेला धोकाही टळत नाही. अनेक नेते मारले गेले असले, तरी अध्यक्ष मेसूद पेझेश्कियान, धार्मिक नेते मोजतबा खामेनी आणि परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची असे काही अजूनही जिवंत आहेत. तसेच इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कोअरचे कमांड सेंटर आणि सेनानी सक्रिय आहेत. त्यामुळे सध्या अमेरिका आणि इस्रायलचा मारा सहन करताना, होर्मुझची नाकेबंदी, अरब देशांवर हल्ले, तसेच आता लाल समुद्रातील बाब एल मंडेब या दुसऱ्या सागरी मार्गाची कोंडी करत इराणने आव्हान जिवंत ठेवलेले दिसते. किमान त्या धोरणात एक स्थैर्य आहे.
व्हिएतनामची पुनरावृत्ती?
अमेरिकेने आणि इस्रायलने कितीही हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले केले, तरी इराणचा या लढाईत पराभव करायचा असेल, तर इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याखेरीज पर्याय नाही. तो पुढाकार अमेरिकेलाच घ्यावा लागेल. पण नेमके कुठे सैन्य उतरवणार हे स्पष्ट नाही. यापूर्वी इराक, अफगाणिस्तान, लिबियासारख्या देशांमध्ये अमेरिकेने आधी बॉम्बवर्षाव करून संबंधित देशांचे लष्कर आणि सरकारला नेस्तनाबूत केले, नंतर लष्कर उतरवले. इराणच्या बाबतीत ते संभवत नाही. कारण इराण नेस्तनाबूत झालेला नाही. शिवाय त्या देशाच्या लष्कराचे फारसे नुकसान झालेले दिसून येत नाही. अमेरिकेने लष्कर उतरवून दाखवावेच, आम्ही तयारीत आहेत असे इराणने म्हटले आहे. शिवाय लष्कर उतरवायचे तर ट्रम्प यांच्या ‘मागा’ धोरणाशी ती थेट फारकत ठरेल. इतरांची युद्धे लढण्यासाठी आमच्या सैनिकांचे बलिदान नको ही ती भूमिका. इराणसारख्या तगड्या प्रतिस्पर्धीसमोर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी ही ठरलेली आहे. व्हिएतनाम युद्धातही तेथील व्हिएतकाँग बंडखोरांचा निःपात केल्याच्या समजुतीतून अमेरिकेने लष्कर उतरवले आणि त्याचा मोठा फटका त्यांना बसला. तो मुद्दा त्यावेळी राजकीय ठरला होता, याही वेळी तसेच संभवते. पण लष्कर उतरवले नाही तर इराणच्या पराभवाची एकमेव शक्यता मावळते अशा कोंडीत सध्या ट्रम्प अडकले आहेत. ते अशा अवस्थेत अधिक अविचारी पद्धतीने वागतात हे दिसून आले आहेच. त्यामुळे व्हिएतनामसारखे दुःसाहस ते याही वेळी करण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.
siddharth.khandekar@expressindia.com
