Donald Trump Speech : अमेरिका-इराण युद्धात इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इराणमधील काही दिग्गज नेत्यांसह प्रमुख लष्करी अधिकारी आणि शेकडो नागरिकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला. एवढंच नाही तर या युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव निर्माण झालेला आहे. तसेच या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापारालाही अडथळे निर्माण होत असल्याने याचा फटका अनेक देशांना बसत आहे. तरीही हे युद्ध अद्याप पूर्णपणे थांबलेलं नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध संपवण्याचे संकेत दिले असले तरी त्यांच्या दररोजच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे इराणविरोधातील युद्ध नेमकं केव्हा संपणार? या बाबतचा संभ्रम कायम आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच अमेरिकेला संबोधित केलं. यावेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हे युद्ध संपवण्याचे संकेत दिले. मात्र, दुसरीकडे इराणला इशाराही दिला. ‘जर कोणताही करार झाला नाही, तर आम्ही इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवू’, असा मोठा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

“अमेरिका इराणविरुद्धची सर्व लष्करी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. अमेरिका पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर पुन्हा जोरदार हल्ला करेल. जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका इराणला पुन्हा अश्मयुगात पोहोचवेल. मात्र, मुख्य उद्दिष्ट पूर्णत्वाच्या जवळ येत असल्याने हा संघर्ष काही कालावधीत संपवला जाऊ शकतो”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला की, “इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात यश आलं आहे. त्यांचं नौदल नष्ट झालं आहे. हवाई दल उध्वस्त झालं आहे आणि त्यांचं नेतृत्वही संपवण्यात आलं आहे. प्रमुख संरक्षण कारखाने आणि पायाभूत सुविधा बहुतांशी नष्ट झाल्यामुळे इराणची क्षेपणास्त्र प्रक्षेपण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे”, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

‘इराणवर विश्वास ठेवता येणार नाही’, डोनाल्ड ट्रम्प

“इराणवर अणुशस्त्रांच्या बाबतीत कधीही विश्वास ठेवता येणार नाही. सध्या अमेरिका आपली उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. अमेरिका आपल्या आखाती मित्र राष्ट्रांना कोणत्याही स्वरूपात हानी पोहोचू देणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

‘इंधनाच्या दरातील वाढ ही अल्पकालीन’

“इंधनाच्या दरात झालेली वाढ ही इराणने प्रादेशिक तेलवाहू जहाजांवर केलेल्या हल्ल्यांमुळे झालेली अल्पकालीन वाढ आहे. पण किंमती लवकरच खाली येतील. तसेच अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलावर अवलंबून नाही आणि भविष्यातही राहणार नाही. या मार्गावर अवलंबून असलेल्या देशांनी थोडं धाडस दाखवून याची काळजी घ्यावी”, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.