Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाची जगभरात चर्चा होत आहे. या चर्चांचं कारण म्हणजे ट्रम्प यांनी आतापर्यंत जपान, दक्षिण कोरिया, दक्षिण अफ्रिका, चीन, भारतासह आदी देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलेलं आहे. ट्रम्प यांच्या या टॅरिफचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फटका बसत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर ट्रम्प यांच्या या टॅरिफला जगातील अनेक देशांनी विरोध दर्शवला आहे. एवढंच नाही तर अमेरिकेतील नागरिकांनी देखील टॅरिफला विरोध करत ट्रम्प यांच्यावर धोरणावर नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलेलं आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानाही ट्रम्प यांनी आता टॅरिफबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘टॅरिफ’ला विरोध करणारे लोक मूर्ख आहेत’, असं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. तसेच अमेरिकन नागरिकांसाठी ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ट्रम्प यांनी रविवारी घोषणा करत म्हटलं की, ते लवकरच बहुतेक अमेरिकन नागरिकांना २००० डॉलर्सचा ‘टॅरिफ डिव्हिडंड’ (लाभ) देणार आहेत. या संदर्भात ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर सविस्तर पोस्ट देखील शेअर केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प पोस्टमध्ये काय म्हटलं?
ट्रुथ सोशल अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्यापार धोरणावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. ट्रम्प म्हणाले की, “जे लोक टॅरिफचा विरोध करत आहेत, ते मूर्ख आहेत.” ट्रम्प यांनी पुढे असंही म्हटलं की, ‘त्यांच्या प्रशासनाने अमेरिकेला जगातील सर्वात श्रीमंत, सर्वात प्रतिष्ठित देश बनवलं आहे. जिथे जवळजवळ कोणतीही महागाई नाही आणि विक्रमी शेअर बाजार किंमत आहे.’
ट्रम्प यांनी असाही दावा केला की, देशाला टॅरिफमधून ट्रिलियन डॉलर्स मिळत आहेत. ज्याचा वापर ३७ ट्रिलियन डॉलर्सचं राष्ट्रीय कर्ज कमी करण्यासाठी केला जाणार आहे. ट्रम्प यांनी म्हटलं की, ‘त्यांचं प्रशासन लवकरच ते फेडण्यास सुरुवात करेल आणि जवळपास सर्व अमेरिकन लोकांना प्रति व्यक्ती किमान २००० डॉलर्सचा लाभांश जारी करेल.’ दरम्यान, ट्रम्प यांनी प्रस्तावित टॅरिफ लाभ नेमका कशा प्रकारे वितरित केला जाईल किंवा तो कधी लागू होईल याबद्दल अधिक माहिती शेअर केली नाही.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवरून पुन्हा एकदा वादविवाद सुरू झाला आहे. त्यांचे समर्थक हे आर्थिक बळकटीचं लक्षण मानत आहेत, तर टॅरिफमुळे देशात महागाई वाढत असून जनतेवर अतिरिक्त भार टाकत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. ट्रम्प यांच्या २००० डॉलर्सच्या लाभ देण्याच्या नव्या आश्वासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून ही योजना नेमकी कशा प्रकारे काम करेल? असे सवाल विचारले जात आहे.
