अमेरिका- इराण युद्ध सुरू होऊन आता तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे, पण अद्याप देखील या युद्धाबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. काही दिवसांपूर्वी युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे. पण युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असली तरी युद्ध संपलेलं नाही. दोन्ही देशातील तणाव अद्यापही कायम आहे. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. कारण मध्य पूर्वेतील या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला अडथळे निर्माण होत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारासाठी चर्चा सुरू आहेत. मात्र, काही अटी-शर्थींमुळे दोन्ही देशात शांतता करार अद्याप होऊ शकलेला नाही. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा यावर भाष्य करत शांतता करार अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा या कराराबाबत मोठं भाष्य केलं आहे.
इराणने शांतता कराराला अद्याप सहमती का दिली नाही? या प्रश्नांवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी काही कारणं सांगितली आहेत. डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी म्हणाले की, “इराणबरोबर सुरू असलेलं युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेबरोबरच्या कराराला इराणने अद्याप सहमती दर्शवलेली नाही, कारण त्यांचे नेते ‘सामर्थ्यवान’ आणि ‘स्वाभिमानी’ आहेत. पण असं असलं तरी तेहरानला अखेरीस वाटाघाटीच्या टेबलावर यावंच लागेल.”
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर इराणचे नेते ज्या परिस्थितीत सापडले आहेत, ती स्वीकारण्यासाठी ते धडपडत आहेत. ते सामर्थ्यवान आहेत, ते स्वाभिमानी आहेत. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांना कराव्या लागतील असा कधी त्यांनी विचारही केला नसेल. मात्र, आता त्यांना त्या कराव्या लागणार आहेत. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. कदाचित याला आणखी थोडा वेळ लागेल”, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ते एनबीसी न्यूजशी बोलत होते.
दरम्यान, एप्रिलमध्ये अमेरिका आणि इराण अशा दोन्ही बाजूंनी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. त्यानंतर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आणि पुढे त्याचा कालावधी देखील वाढण्यात आला होता. सध्या युद्धविराम असला तरी दोन्ही देशांकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ काही ठिकाणी हल्ले केले जात असल्याने हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
