Donald Trump confirms Strait of Hormuz will open soon : अमेरिका-इराण यांच्यात युद्धविराम झाले असले तरीही इस्रायल लेबनॉन युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी अद्यापही जलवाहतुकीसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील पुरवठा साखळी अद्यापही विस्कळीत झाली आहे. दरम्यान, यामुळे कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिलाय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इराणच्या सहकार्यासह किंवा त्याशिवाय वॉशिंग्टन लवकरच ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) खुली करेल. मात्र, त्यांनी आपल्या विधानावर अधिक भाष्य केले नाही, पण हे पाऊल उचलणे सोपे नसेल याचीही कबुली दिली.
मेरीलँडमधील ‘जॉइंट बेस अँड्र्यूज’ येथे एअर फोर्स वनमध्ये जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, “हे सोपे नसेल. पण मी एवढेच सांगेन की आम्ही ती सामुद्रधुनी लवकरच खुली करू.” ट्रम्प यांनी असेही सुचवले की इतर देश मदतीसाठी पुढे येत आहेत, मात्र त्यांनी कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही. “इतर देशही या सामुद्रधुनीचा वापर करतात. त्यामुळे इतर देश मदतीला येत आहेत आणि ते सहकार्य करतील”, असं ट्रम्प म्हणाले.
इराणला टोल वसूल करू देणार नाही
इराण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून टोल (शुल्क) वसूल करणार असल्याच्या वृत्तावरही ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. ही आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रे असल्याचे सांगत, अमेरिका इराणला असा टोल वसूल करू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘फायनान्शिअल टाइम्स’च्या वृत्तानुसार, तेहरान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर प्रति बॅरल १ डॉलर टोल आकारणार आहे.
मात्र, इराणसोबत या महत्त्वाच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण राखणाऱ्या ओमानने अशा कोणत्याही योजनेचा इन्कार केला आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून तेहरानने ही सामुद्रधुनी रोखून धरल्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात इतिहासातील सर्वात मोठे व्यत्यय आले आहेत. जागतिक तेल आणि लिक्विफाइड नॅशनल गॅस (LNG) वाहतुकीच्या सुमारे २० टक्के भाग या सामुद्रधुनीतून जातो. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी नाटो (NATO) मित्रदेशांकडून मदत मिळत नसल्याबद्दल ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर नाटोचे सरचिटणीस मार्क रट्टे यांनी युरोपीय सरकारांना सांगितले की, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना येत्या काही दिवसांत ही सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी ठोस वचनबद्धता हवी आहे.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले. अमेरिका-इस्रायलचे इराणवरील हल्ले आणि इस्रायलचे लेबनॉनवरील हल्ले यात हजारो लोक मारले गेले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत.
या युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्या असून जागतिक बाजारपेठ हादरली आहे. वॉशिंग्टनने मंगळवारी तेहरानसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती, त्यापूर्वी त्यांनी इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिली होती. दरम्यान, इस्रायल शेजारील लेबनॉनवर बॉम्बहल्ला करत असल्याने सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक अद्याप ठप्प आहे, यामुळे युद्धविरामाला धोका निर्माण झाला आहे.
