Donald Trump comments on reopening Strait of Hormuz amid escalating Iran-US conflict : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. या संघर्षामुळे इराणने जागतिक उर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली आहे. यामुळे जगभरात ऊर्जा तुटवड्याचे संकट निर्माण झाले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून थोडा वेळ मिळाला तर अमेरिका होर्मुझची सामुद्रधुनी सहज खुली करू शकते, असे विधान केले आहे.
ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी अमेरिका या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाचा आणि त्याद्वारे होणार्या तेलाच्या वाहतुकीचा ताबा घेऊ शकते असे सूचित केले आहे. याद्वारे इराणच्या कारवायांना निर्णायक उत्तर देण्यासाठी त्यांच्या प्रशासनावर सातत्याने वाढत असलेला दबाव ट्रम्प यांनी यावेळी अधोरेखित केला.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“आणखी थोडा वेळ मिळाल्यास, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सहजपणे खुली करू शकतो, तेथील तेल मिळवू शकतो आणि प्रचंड संपत्ती कमवू शकतो,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्तपणे इराणवर हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष पेटला, यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले आहेत. या संघर्षाला आता जवळपास ५ आठवडे होत आले आहेत, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षानंतर इराणे प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. हा मार्ग अरुंद असला तरी अत्यंत महत्त्वाचा असून, जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी सुमारे पाचवा हिस्सा याच समुद्री मार्गातून जातो.
इराणने हा सागरी मार्ग बंद केल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, या मार्गाने ऊर्जेची आयात करणाऱ्या आणि त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या देशांची चिंता वाढली आहे.
दरम्यान रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी संघर्ष संपवण्यासाठी किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कोणताही ‘डिप्लोमॅटिक रोडमॅप’ आखलेला नाही. याउलट, ट्रम्प हे जर होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरली तर अमेरका इराणच्या ऊर्जा संबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य करू शकते, असे वारंवार सांग आहेत. यावर इराणकडून देखील तसेच प्रत्युत्तर दिले जात आहे.
