Donald Trump Strait Of Hormuz Map: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होर्मुझ सामुद्रधुनीचा नकाशा शेअर केला आहे. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी आता अमेरिकन भूभाग म्हणून दाखवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी होर्मुझवर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. यानंतर इराणबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा नकाशा शेअर केला आहे.
इराण मागण्यांवर ठाम
इराणने मात्र अमेरिकेने नाकाबंदी मागे घेतल्याशिवाय आणि इतर मागण्या मान्य केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. इराणकडून वाटाघाटी करण्यात आघाडीवर असणारे मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सरकारी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित केलेल्या भाषणात ही घोषणा केली. अमेरिका जून महिन्यातील करारात ठरलेल्या सामंजस्य करारातील अटींची पूर्तता करत नाही, तोपर्यंत जलमार्ग बंदच राहील, असे गालिबाफ यांनी स्पष्ट केले.

इराणच्या मागण्या कोणत्या आहेत.
१) अमेरिकेकडून लादलेली नौदल नाकाबंदी पूर्णपणे उठवावी.
२) इराणवरील तेल निर्बंध मागे घ्यावेत.
३) गोठवण्यात आलेली इराणची संपत्ती व मालमत्ता पूर्ववत करावी.
इराणची भूमिका
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर २८ फेब्रुवारी रोजी केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले. ८ एप्रिलपासून बॉम्बहल्ल्यांना विराम मिळाला असला, तरी होर्मुझची सामुद्रधुनी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात अद्यापही अधूनमधून चकमकी सुरू आहेत. युद्धाची सुरुवात झाल्यापासून होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली आहे. इराणने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना परवानगी घेणे आणि वाहतूक सेवा शुल्क अदा करणे बंधनकारक केले आहे.
ट्रम्प यांचा इराणला इशारा
होर्मुझबाबतच्या तडजोडीत ओमानने आडकाठी आणल्यास ओमानवर बॉम्बहल्ला करण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. तसेच, देशांतर्गत राजकीय अडचणी वाढवत चाललेल्या या युद्धात इराणने आता शरणागती पत्करावी, अशी मागणीही ट्रम्प यांनी केली आहे. दरम्यान, शत्रूच्या प्रत्येक कृतीला आणि आक्रमक पावित्र्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इराण सज्ज आहे, अशा शब्दात गालिबाफ यांनी ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिले आहे.
