अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिका-इराणमधील शस्त्रसंधी काही दिवसांपूर्वी संपुष्टात आल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर या दोन्ही देशातील तणावात वाढ झाल्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. याचा फटका जगातील अनेक देशांना बसत असून होर्मुझ सामुद्रधुनीत देखील मोठा तणाव आहे.
अमेरिका-इराण युद्धात आतापर्यंत इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. इराणमधील काही दिग्गज नेत्यांसह प्रमुख लष्करी अधिकारी आणि शेकडो नागरिकांना या युद्धात आपला जीव गमवावा लागला आहे. एवढंच नाही तर युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियात तणाव आहे. तसेच या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक व्यापारालाही अडथळे निर्माण होत असून होर्मुझ सामुद्रधुनीत कायम तणावाचं वातावरण आहे. अशी परिस्थिती असतानाही अद्याप हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही.
यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण आहे’, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ट्रम्प यांनी इराणबाबत एक दावा केला आहे. इराणकडे फक्त ‘फेक न्यूज’ आणि ३०० टक्के महागाई असून त्यांचं सैन्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण आहे आणि मला वाटतं की आम्ही ते नियंत्रण कायम ठेवू. अमेरिकेच्या नौदलाच्या नाकेबंदीचं वर्णन सर्वजण ‘पोलादी भिंत’ असं करत आहेत, त्याबाबत इराण काहीही करू शकत नाही. त्यांच्याकडे नौदल नाही, हवाई दल नाही, उरलेल्या सैनिकांना पगार मिळालेला नाही, आयआरजीसी पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन पळ काढत आहे. तसेच त्यांच्या नेतृत्वाची स्थिती देखील अतिशय अनिश्चित आहे. त्यांच्याकडे पैसा नाही. त्यांचा देश पूर्णपणे कोलमडला आहे. त्यांच्याकडे केवळ ‘फेक न्यूज’ आणि ३०० टक्के महागाई आहे. जी दिवसेंदिवस आणखी वाढत चालली आहे. इराण केवळ बढाया मारतो, कृती काहीच करत नाही. त्यामुळे आता इराण मध्य पूर्वेतील दादागिरी करणारा देश राहिलेला नाही. अल्लाहचे आभार”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
