Donald Trump summoning Scott Besent during live interview Video : अमेरिका-इस्रायल आणि इराण या देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अर्थमंत्र स्कॉट बेसेंट यांना टीव्हीवर सुरू असलेली लाईव्ह मुलाखत सोडून जावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना तातडीने ‘सिच्युएशन रूम’मध्ये बोलल्याने बेसेंट यांना जावे लागले. ६३ वर्षीय बंझंट हे व्हाईट हाऊसमध्ये स्काय न्यूजच्या विल्फ्रेड फ्रॉस्ट यांना मुलाखत देत होते, यावेळी एक सहकाऱ्यांने तेथे येत “राष्ट्राध्यक्षांना तुम्ही ताबडतोब हवे आहात” असे सांगितले.
सकाळी १० वाजून २२ मिनीटांनी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला असून त्यामध्ये बेसेंट हे त्यांचा मायक्रोफोन काढताना आणि तेथून निघून जाताना दिसत आहेत. यानंतर जवळपास एक तासानंतर बेसेंट हे मुलाखतीसाठी परतले.
जेव्हा बेसेंट परत आले, तेव्हा ते चांगलेच अस्वस्थ दिसत होते आणि बोलताना काहीसे अडखळत देखील होते. ‘स्काय न्यूज’च्या पत्रकाराने जेव्हा त्यांना ट्रम्प कसे आहेत आणि ते तणावात आहेत का, असे विचारले, तेव्हा बेसेंट यांनी उत्तर दिले की, “राष्ट्राध्यक्ष खूप चांगल्या मनस्थितीत आहेत. इराणमधील मोहीम नियोजित वेळेच्या बरीच पुढे आहे.”
अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या किशोरवयीन मुलाबद्दल बोलताना बेसेंट यांनी तो सध्या लष्करात भरती होण्याचा विचार करत आहे असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, “मी माझ्या मुलाचे आयुष्य त्यांच्या हातात सोपवण्याइतका विश्वास त्यांच्यावर ठेवतो.” संपूर्ण उत्तरे देताना बेसेंट यांचा आवाज थरथरत असल्याचे दिसून आले.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत संघर्ष पेटला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्याने जगभरातिल तेलाचा पुरवठा देखील खंडित झाला आहे.
संघर्षाच्या ताज्या घडामोडीदरम्यान शुक्रवारी इराक येथे अमेरिकेचे विमान कोसळले, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. इराणचा पाठिंबा असलेल्या इराकमधील एका इस्लामिक गटाने हे विमान पाडल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असे वृत्त रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. मात्र अमेरिकन लष्कराने या दावा फेटाळला आहे.
तर दुसरीकडे ट्रम्प यांनी जी७ च्या नेत्यांबरोबर झालेल्या फोनवर ट्रम्प यांनी इराण शरणागती पत्करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे, Axiosने या संबंधीचे वृत्त दिले आहे.
