Trump pauses Iran strikes for two weeks: संपूर्ण इराणी संस्कृती बेचिराख करण्याचा इशारा देणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी इराणविरोधात नियोजित लष्करी कारवाई तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. “पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे”, असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. “इराणने ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ तात्काळ पूर्णपणे आणि सुरक्षितपणे व्यापारासाठी खुली ठेवण्याचे मान्य केल्यास, अमेरिका पुढील दोन आठवड्यांसाठी इराणवरील संभाव्य बॉम्बहल्ला आणि लष्करी कारवाई थांबविण्यास तयार आहे”, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

​राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा उभयपक्षी झालेला ‘युद्धविराम’ असेल असेही स्पष्ट केले आहे. “अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे केवळ पूर्णच केलेली नाहीत, तर ती ओलांडली आहेत. इराणसोबत दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने अमेरिका आता एका निर्णायक कराराच्या उंबरठ्यावर आहे”, असे ट्रम्प यांनी या निर्णयामागची पार्श्वभूमी विशद करताना म्हटले आहे.

ट्रुथ सोशलवर पोस्ट

इराणकडून अमेरिकेला १० कलमी शांतता प्रस्ताव प्राप्त झाला असून, चर्चेसाठी हा एक व्यवहार्य आधार असल्याचे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. अमेरिका आणि इराणमधील वादाचे बहुतांश जुने मुद्दे आता निकाली निघाले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “पुढील दोन आठवड्यांचा कालावधी हा प्रलंबित चर्चांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि त्याची अधिकृत अंमलबजावणी करण्यासाठी वापरला जाईल”, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष या नात्याने आणि मध्यपूर्वेतील देशांचे प्रतिनिधीत्व करताना, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणे हा माझ्यासाठी सन्मानाचा विषय आहे,” असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

Donald Trump X Post
Donald Trump Post On Truth Social

इराणकडूनही दुजोरा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने निवेदन जारी करत अराघची यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी करण्यात आल्याचे मान्य केले आहे. अराघची यांनी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शस्त्रसंधीसाठी केलेल्या विनंतीचा उल्लेख केला आहे.

ट्रम्प यांनी दिलेली मुदत समाप्त

ट्रम्प यांनी दिलेली अंतिम मुदतीची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसे अमेरिका आणि इस्रायलने रेल्वे व रस्त्यांवरील पूल, एक विमानतळ आणि एका पेट्रोकेमिकल प्रकल्पाला लक्ष्य करून हल्ले तीव्र केले होते. अमेरिकी सैन्याने इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र असलेल्या खर्ग बेटावरील ठिकाणांवरही हल्ला केला. इराणने देखील स्पष्ट शब्दात प्रत्युत्तर देत, आखाती देशांमधील पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यापासून आता मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले. इराणने आखातातील एका जहाजावर आणि सौदी अरेबियाच्या एका मोठ्या पेट्रोकेमिकल संकुलावर हल्ले केल्याचा दावाही केला आहे.

दरम्यान, उभय देशांत शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला असून, पाकिस्तानने यासाठी यशस्वी मध्यस्थी केल्याचे दिसून येते. पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यासाठी दोन्ही देशांचे आभार मानले आहेत.

ट्रम्प यांच्या धमकीमुळे वाढली होती जगाची धास्ती

आज रात्री संपूर्ण इराणी संस्कृती बेचिराख करण्याचा इशारा ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर दिला होता. ‘होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा अन्यथा तुम्हाला नरकयातना भोगाव्या लागतील,’ असा इशारा नुकताच दिला. पत्रकार परिषदेत सोमवारी त्यांनी इराणमधील प्रत्येक पूल, ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केला जाईल असा इशारा दिला. तसेच ‘संपूर्ण इराण एका रात्रीत नष्ट करता येईल आणि ही रात्र कदाचित उद्याचीच असेल,’ असेही ते म्हणाले होते. ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते नक्की काय निर्णय घेणार? याकडे जगाचे लक्ष लागले होते. दरम्यान, इराणविरोधात अणुबॉम्ब वापराच्या शक्यता अमेरिकेने खोडून काढल्या होत्या.