…अन् पत्रकार परिषद सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये नेण्यात आलं

व्हाइट हाऊसबाहेर आंदोलक जमा झाल्याने निर्माण झाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेत सध्या जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात तणाव असून याची झळ व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचली आहे. जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतऱ अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरु असून काही ठिकाणी दंगली आणि हिंसाचार सुरु आहे. आंदोलनकर्ते शुक्रवारी रात्री व्हाइट हाऊसच्या दिशेने जाण्यासाठी एकत्र आले होते. यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना व्हाइट हाऊसच्या भूमिगत बंकरमध्ये नेण्यात आलं. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व घटनेची माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच हे सांगितलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प जवळपास अर्धा तास बंकरमध्ये होते. यानंतर त्यांना पुन्हा वरती आणण्यात आलं. हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते व्हाइट हाऊसच्या दिशेने येऊ लागल्यानंतर सिक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट्स पार्क पोलीस त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत होते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आंदोनकर्ते व्हाइट हाऊसच्या बाहेर एकत्र आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची टीम आश्चर्य व्यक्त करत होती. यावेळी पत्नी मेलानिआ ट्रम्प आणि मुलगा बैरॉन ट्रम्प त्यांच्यासोबत होते का याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

काय आहे प्रकरण ? अमेरिकेत का सुरु आहे हिंसाचार ?
जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरु आहे. अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलनं सुरु आहेत.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. जवळपास १५ शहरांमध्ये आंदोलन सुरु असून अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Donald trump taken to underground bunker during white house protests sgy

ताज्या बातम्या