Donald Trump On Iran : अमेरिका-इराण युद्ध सुरू होऊन आता एक महिना उलटला आहे. या युद्धात इराणचं सर्वाधिक नुकसान झालं आहे, पण अद्यापही हा संघर्ष थांबलेला नाही. २८ फेब्रुवारीपासून पश्चिम आशियात पेटलेल्या या युद्धाची धग अद्यापही धुमसत असल्यामुळे त्याचा जागतिक बाजारपेठेवर मोठा परिणाम होत आहे. त्या अनुषंगाने युद्धविरामाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे इराणला रोज धमकी देणारे वक्तव्य करत असल्याने हे युद्ध कधी थांबणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्राला उद्देशून १८ मिनिटांचं भाषण केलं होतं. त्या भाषणातही इराणबरोबरील युद्ध संपवण्याबाबत ट्रम्प यांनी स्पष्ट भाष्य केलं नाही. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला मोठा इशारा दिला आहे. ‘जर इराणने लवकरात लवकर करार केला नाही, तर सर्व काही उडवून देऊ आणि तेल ताब्यात घेऊ’, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“जर इराणने लवकरात लवकर करार केला नाही, तर सर्व काही उडवून देण्याचा आणि तेल ताब्यात घेण्याचा मी विचार करत आहे. तुम्हाला त्यांच्या संपूर्ण देशात पूल आणि वीज प्रकल्प कोसळताना दिसतील”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटलं असल्याचं वृत्त फॉक्स न्यूजने दिलं आहे. तसेच पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला की, “काही इराणी अधिकारी सध्या चर्चा करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की सोमवारपर्यंत करार होण्याची दाट शक्यता आहे.”

‘होर्मुझ’वरून ट्रम्प यांना संताप अनावर, इराणला थेट शिवीगाळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला त्यांच्या खास ‘ट्रम्प शैलीत’ धमकी देत थेट शिवीगाळ केली आहे. त्यांनी तेहरानमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर समन्वित हल्ले करण्याचा उघड इशारा दिला. या धमकीसोबतच ट्रम्प यांनी वापरलेल्या भाषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Donald Trump On Iran

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे ठरेल. यापेक्षा दुसरं काहीही नसेल. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अथवा तुम्ही नरकात जाल. तुम्ही पाहतच बसा”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

इराण युद्धाबाबत साशंकता कायम

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिगणी पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यादरम्यान युद्धाला पाच आठवडे पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीनच तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेले युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावं लागणार आहे. युद्धाची ठिणगी पडल्यानंतर हा संघर्ष दीर्घकाळ चालणार, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सध्याच्या युद्धाचा कालावधी किती कमी आहे हे पटवून देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेने भूतकाळात लढलेल्या मोठ्या युद्धांचा दाखला दिला. त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीची या युद्धाशी तुलना केली.