Donald Trump threatens Apple with 25 percent tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्मार्टफोन बनवणारी कंपनी अॅपलवर निशाणा साधला आहे. यावेळी ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली असून आयफोन बनवणाऱ्या कंपनीला थेट धमकी दिली आहे. अमेरिकेत विकले जाणारे आयफोन हे अमेरिकेतच तयार झालेले पाहिजेत, भारत किंवा इतर कुठे नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी याबद्दल अॅपलचे सीईओ टिम कुक यांना आधीच सांगितले होते आणि जर अॅपलने याचे पालन केले नाही तर कंपनीवर किमान २५ टक्के कर लादला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
“मी खूप आधी अॅपलच्या टीम कूक यांना सांगितलं होतं की मला अपेक्षा आहे की अमेरिकेत विकले जाणाऱ्या त्यांच्या आयफोनचे उत्पादन आणि निर्मिती ही अमेरिकेत होईल, भारतात किंवा इतर कुठे नाही. जर तसं झालं नाही तर अॅपलला अमेरिकेला २५ टक्के कर द्यावा लागेल. याकडे लक्ष दिल्याबद्दल तुमचे आभार!” अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान त्यांनी कूक यांना भारतात आयफोनचे उत्पादन करू नका, त्याऐवजी अमेरिकेत आयफोन तयार करा असे सांगितल्यानंतर आठवडाभरात करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेच्या बाहेर उत्पादन करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर दबाव टाकला जात आहे, यादरम्यान अॅपलला ट्रम्प यांनी हा इशारा दिला आहे. ॲपल कंपनी ही चीनमधील आपले उत्पादन कमी करून भारतातील उत्पादन हळूहळू वाढवू इच्छित आहे. सध्या एकूण आयफोनपैकी भारतात १५ टक्के आयफोनचे उत्पादन होत आहे. येत्या वर्षात हे उत्पादन एक चतुर्थांशने वाढविण्याची कंपनीची योजना आहे. विशेष म्हणजे अॅपल अमेरिकेत आयफोनची निर्मिती करत नाही. कंपनीचे बहुतांश आयफोन हे चीनमध्ये तयार केले जातात. तर भारतात दरवर्षी ४० दशलक्ष युनिट्स तयार केले जातात.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, १५ मे रोजी कतारमधील दोहा येथे ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर लगेचच, भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी अॅपलच्या अधिकार्यांशी चर्चा केली होती. यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की अॅपलच्या भारतातील गुंतवणुकेसंबंधीच्या योजना कायम आहेत. तसेच त्यांची कंपनी भारताला त्यांचे एक प्रमुख उत्पादन केंद्र बनवण्याच्या विचारात आहे.
कूक यांनी यापूर्वी म्हटले आहे की, जून क्वार्टरमध्ये अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन हे भारतून आणलेले असतील, तर व्यापार करामधील अनिश्चिततेमुळे चीनमध्ये इतर मोठ्या बाजारपेठांसाठी डिव्हाइस तयार केले जातील.
दोहा येथे ट्रम्प काय म्हणाले होते?
डोनाल्ड ट्रम्प दोहा येथे दौऱ्यावर असताना कूक यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, “मी टीम कुक यांच्याशी बोललो. मी त्यांना म्हणालो, टीम, आम्ही तुमच्याशी खूप चांगले वागतोय. तुम्ही ५०० अब्ज डॉलर्सची कंपनी बांधत आहात, पण आता मी ऐकत आहे की तुम्ही भारतात कारखाने उभारत आहात. तुम्ही आधी चीनमध्ये कारखाने उभारले, ते आम्ही वर्षानुवर्षे सहन केले. आता आम्हाला तुम्ही भारतात कारखाने स्थापन करावेत, असे मला वाटत नाही. भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो. ते खूप चांगले काम करत आहेत. तुम्ही अमेरिकेत कारखाने उभारावेत असे आम्हाला वाटते.”
भारतात आयफोन्सची निर्मिती
भारतात तयार केलेले आयफोनची असेंबली ही तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी फॉक्सकॉनच्या तामिळनाडू येथील कारखान्यात होते. पेगाट्रॉन कॉर्प चालवणारी कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी भारतातील आयफोनची दुसरी प्रमुख उत्पादन कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या भारतात आयफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन कारखाने उभारत आहेत. ३१ मार्चला संपलेल्या आर्थिक वर्षात अॅपलने भारतात ६० टक्के जास्त आयफोन्स तयार केले आहेत, ज्यांची किंमत अंदाजे २२ अब्ज डॉलर्स इतकी आहे. फॉक्सकॉनने निर्यातीसाठी तेलंगणामध्ये अॅपल एअरपॉड्सचे उत्पादन देखील सुरू केले आहे.