अमेरिका आणि इराणमधील युद्ध समाप्तीच्या करारासंबंधीची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरी देखील दोन्ही देशांत करार होऊ शकला नाही. होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प व संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी बुधवारी (१० जून) केला होता. मात्र, अमेरिकेचा हा दावा इराणने फेटाळून लावला होता.

होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणारी सागरी वाहतूक रोखण्याचा अधिकार अजूनही आपल्याकडे असल्याचा दावा इराणने केला होता. या सर्व घडामोडीनंतर आज (११ जून) डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत इराणला मोठा इशारा दिला आहे. अमेरिका इराणवर आज सर्वात मोठा हल्ला करणार असल्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दिले आहेत. एवढंच नाही तर इराणच्या खर्ग बेटाचा ताबा घेण्याची धमकी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे जगात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“अमेरिका आज रात्री इराणवर अत्यंत जोरदार प्रहार करणार आहे. (ज्यांचे नौदल, हवाई दल, रडार, विमान-विरोधी यंत्रणा आणि इतर सर्व प्रकारची संरक्षण व्यवस्था, तसेच त्यांची बहुतांश आक्रमक क्षमता आता पूर्णपणे नष्ट झालेली आहे.) नजीकच्या भविष्यात कधीतरी, आम्ही खर्ग बेट आणि तेलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांची ठिकाणं ताब्यात घेऊ आणि त्यांच्या तेल व वायू बाजारांवर पूर्ण नियंत्रण मिळवू. अगदी तसंच जसं आम्ही व्हेनेझुएलाच्या बाबतीत केलं आहे आणि ही बाब व्हेनेझुएला तसंच अमेरिका या दोघांसाठीही अत्यंत फायदेशीर ठरत आहे. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

Donald Trump threatens Iran

खर्ग बेट काय आहे?

होर्मुझ सामुद्रधुनीच्या वायव्येस ३०० मैल (४८३ किमी) आणि इराणाच्या किनाऱ्यापासून १६ मैल (२६ किमी) अंतरावर खर्ग बेट स्थित आहे. इराणच्या तेल निर्यातीचे ते एक्सपोर्ट टर्मिनल म्हणून ओळखलं जातं. इराणची ९० टक्के तेलवाहू जहाज इथूनच जातात. लक्षद्वीपच्या एकत्रित बेटापेक्षा लहान असलेले हे बेट इराणच्या तेल उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचं ठिकाण आहे.

खर्ग बेट इराणसाठी महत्त्वाचं का आहे?

इराणसाठी खर्ग बेट धोरणात्मकदृष्ट्या अतिमहत्त्वाचं आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने १९८४ सालच्या एका गुप्त अहवालात खर्ग बेट इराणच्या पेट्रोलियम व्यवस्थेचा कणा असल्याचं म्हटलं होतं. इराणची अर्थव्यवस्था आणि इराकविरोधातील युद्ध मोहिमेसाठी हे अनन्यसाधारण बेट असल्याचं अमेरिकेचं निरीक्षण आहे.

खर्ग बेटावर तेल साठवण्याची प्रचंड क्षमता आहे. या बेटाला समुद्रमार्गे पाईपलाईनद्वारे तेल आणि वायू प्रकल्पांना जोडण्यात आलेले आहे. अल जझीराने इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाचा हवाला देऊन वृत्त दिलं होतं की, खार्ग बेटावर कच्चे तेल काढण्यात येणारे अबूझर, फोरोझान आणि डोरूड हे तीन मोठे ऑफशोअर फिल्ड आहेत. येथून कच्चे तेल पाण्याखालील पाइपलाईनद्वारे बेटावरील प्रक्रिया प्रकल्पात पाठवले जाते. तिथून त्याची निर्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होते.

इराणच्या पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन प्रमुख ऊर्जा सुविधाही याच बेटावर आहेत. त्यापैकी एक असलेली फलत इराण ऑइल कंपनी दररोज पाच लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन करते. देशातील प्रमुख चार तेल शुद्धीकरण प्रकल्पापैकी ही एक मानली जाते.

खर्गवर हल्ला केल्यास काय होईल?

अमेरिकेने खर्गला लक्ष्य केल्यास जागतिक स्तरावरील तेलाच्या किंमती भडकू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या बेटावरील नागरी सुविधांवर हल्ला किंवा बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्यात जागतिक पातळीवर तेलाच्या किंमती वाढू शकतात, असा अंदाज आहे.

Donald Trump threatens Iran
इराणच्या खार्ग बेटाचा ताबा घेण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद?

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध समाप्तीच्या करारासंबंधीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला इशारा दिल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणवर हल्ला केला. अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडने सलग दुसऱ्या दिवशी इराणमधील अनेक लक्ष्यांवर स्व-संरक्षणात्मक हल्ले केल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचा जल मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी या संघर्षानिमित्त पुन्हा एकदा बंद करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

शस्त्रसंधीनंतरही हल्ले सुरू, जगात खळबळ

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात युद्ध सुरू झालं. त्यानंतर अनेकवेळा दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा करार करत त्याला मुदतवाढ देण्यात आली. मात्र शस्त्रसंधी असतानाही अमेरिका आणि इराण एकमेकांवर कुरघोडी केली जात होती. तीन महिन्यांपासून युद्धसमाप्तीसाठी सुरू असलेली वाटाघाटी यशस्वी झालेली नाही. संघर्षामुळे युद्धातून लगेच काही तोडगा निघेल, असं दिसत नाही. आता या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेचे अपाचे हे लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकन लष्कराने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इराणी हवाई संरक्षण आणि रडार सुविधांना लक्ष्य केलं. इराणनेही प्रत्युत्तर देण्यासाठी जॉर्डन, कुवेत आणि बहारीनमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.