वॉशिंग्टन, दुबई : ‘होर्मुझ सामुद्रधुनी सोमवारपर्यंत खुली करा अन्यथा अतिशय गंभीर परिणाम होतील,’ असा अंतिम इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला. इराणला ही धमकी देताना ट्रम्प यांना अर्वाच्य भाषेचा वापर केला.
‘‘इराणसाठी मंगळवार हा ऊर्जा प्रकल्प आणि पूल दिवस असेल,’’ असे असे सांगून त्यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांना अमेरिका लक्ष्य करणार असल्याचे सूचित केले. दरम्यान, इराणचे सांस्कृतिक मंत्री सईद रझा सालिह-अमिरी यांनी ट्रम्प यांची धमकी फेटाळून लावली आहे. ट्रम्प हे ‘अस्थिर, भ्रमावस्थेतील व्यक्ती’ असल्याची टीका त्यांनी केली.
समाजमाध्यमावर केलेल्या टिप्पणीत ट्रम्प म्हणाले, ‘इराणला करार करण्यासाठी किंवा होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी १० दिवस दिले. वेळ निघून जात आहे. आता फक्त ४८ तास उरले आहेत. नरकातील दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. दरम्यान, अमेरिकेने हल्ला केला, तर या भागातील अमेरिकेच्या सर्व लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाईल, असे प्रत्युत्तर जनरल अली अब्दुल्लाही आलियाबादी यांनी दिले.
अमेरिकेने तेहरानवर मोठा हल्ला केल्याची माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. हल्ल्याची चित्रफीत त्यांनी प्रसिद्ध केली. या हल्ल्यात इराणच्या लष्कराचे उच्चपदस्थ ठार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
