दुबई, वॉशिंग्टन : इराणला करार करण्यासाठी दिलेली मंगळवारची मुदत वाढवली जाणार नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले. तसेच इराणने दिलेला शांतता प्रस्ताव पुरेसा नसल्याचे नमूद केले.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अंतिम मुदत पाळली गेली नाही, तर अमेरिका इराणचे ऊर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करेल, या इशार्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. इराणला एका रात्रीत संपवू, आणि ती रात्र आजची असेल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली.
दुसरीकडे, इराणने युद्धसमाप्तीचा प्रस्ताव फेटाळला. पुन्हा आमच्यावर हल्ला होणार नाही अशी हमी मिळाली तरच युद्धसमाप्ती स्वीकारू असे इजिप्तमधील इराणी दूतावासाचे प्रमुख मोजतबा फरदौसी पोर यांनी सांगितले.
इराणने शस्त्रसंधीबाबत आपली भूमिका पाकिस्तानला कळवताना थेट अमेरिकेशी चर्चेस नकार दिला आहे. प्रस्तावित शस्त्रसंधीचा कालावधी ४५ दिवसांचाच असेल तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची मागणीही इराणने फेटाळली. इजिप्त, पाकिस्तान आणि तुर्कीच्या मध्यस्थीने हा युद्धबंदीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनिर हे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, विशेष दूत स्टीव विटकॉफ, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या सतत संपर्कात होते.
‘होर्मुझ’मधून भारताची दोन जहाजे मार्गस्थ
भारताची ‘ग्रीन आशा’ हे ‘एलपीजी’ घेऊन येणारे जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गस्थ झाले आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर या मार्गे येणाके भारताचे हे आठवे जहाज आहे. ‘ग्रीन सान्वी’ हे जहाज शुक्रवारी या ठिकाणाहून मार्गस्थ झाले.
गुप्तचर खात्याचे प्रमुख खादेमी ठार
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले केले. ‘साऊथ पार्स’ नैसर्गिक वायू क्षेत्रालाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत २५हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’चे गुप्तचर खात्याचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचा समावेश आहे. इराणनेही इस्रायलवर आणि शेजारी अरब देशांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
