Donald Trump On US-Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणनेही अमेरिका-इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच इराणने काही आखाती देशांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज इराणच्या अध्यक्षांनी आखाती राष्ट्रांची माफी देखील मागितली. मात्र, त्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिल्यामुळे जगात खळबळ उडाली आहे.
‘आज इराणवर आणखी मोठा हल्ला केला जाऊ शकतो’, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याबाबत ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करत इराणवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्या या धमकीमुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
“इराणने मध्यपूर्वेतील शेजारी राष्ट्रांची माफी मागितली आणि शरणागती पत्करली आहे. तसंच इराणने वचन दिलं की ते आता त्यांच्यावर (आखाती देशांवर) गोळीबार करणार नाहीत. इराणने हे आश्वासन फक्त आणि फक्त अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यामुळेच दिलं. अन्यथा ते मध्यपूर्वेवर ताबा मिळवून राज्य करू इच्छित होते. मागच्या हजारो वर्षांत पहिल्यांदा इराणला त्याच्या शेजारील मध्य पूर्वेकडील देशांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मध्य पूर्वेकडील काही राष्ट्रांनी मला ‘धन्यवाद अध्यक्षही म्हटलं”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला काय धमकी दिली?
“इराण आता मध्य पूर्वेचा दादा राहिलेला नाही तर मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र बनलं आहे, तसेच इराण शरण येईपर्यंत अनेक दशकं असंच पराभूत राष्ट्र राहील किंवा पूर्णपणे कोसळेल. मात्र, आज इराणवर मोठा हल्ला होऊ शकतो. इराणच्या वाईट वर्तनामुळे ज्या क्षेत्रांना आणि लोकसंख्येला आतापर्यंत लक्ष्य मानलं जात नव्हतं, त्यांनाही धोका निर्माण झाला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.

‘आम्ही शेजारच्या देशांची माफी मागतो’, इराणने आखाती राष्ट्रांची मागितली माफी
इराणने शेजारी असलेल्या मुस्लीम राष्ट्रांची माफी मागत क्षेपणास्त्र हल्ले थांबवत असल्याची घोषणा केली. इराणचे अध्यक्ष डॉ. मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलं की, इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेने शेजारील देशांवरील हल्ले आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपण थांबविण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत इतर देशातून हल्ले होणार नाहीत, तोपर्यंत इराणही हल्ले करणार नाही. पेझेश्कियान म्हणाले, “मी शेजारच्या देशांची माफी मागतो. इतर देशांवर आक्रमण करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता. तथापि अमेरिका आणि इस्रायलसमोर शरणागती पत्करणार नाही, असेही पेझेश्कियान यांनी स्पष्ट केले. “इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, अशी इच्छा शत्रूंनी व्यक्त केली. त्यांची इच्छा त्यांच्याबरोबरच त्यांच्या थडग्यात पुरली जाईल”, असेही पेझेश्कियान म्हणाले.
