जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला जबाबदार धरत ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्याच्यावर बंदी घातली होती. ६ जानेवारी यूएस कॅपिटलमध्ये उसळलेल्या दंगलीसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. हिंसाचार आणखी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन ट्विटरने ८८ दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या ट्रम्प यांच्या ट्विटर खात्यावर तात्काळ प्रभावाने कायमची बंदी घातली होती. मात्र ट्विटरचा मालकी हक्क आता टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांच्याकडे जाणार आहे. या वर्षात ट्विटर खरेदीचा व्यवहार पूर्ण होणार आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज अमेरिकन डॉलर्संना विकत घेतले आहे. तेव्हापासून ट्रम्प यांच्यावरील बंदी उठवण्याची शक्यता वर्तवली जात होती. ज्यावर आता इलॉन मस्क यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

फायनान्शिअल टाईम्स फ्यूचर ऑफ कार कॉन्फरन्समध्ये इलॉन मस्क यांनी सांगितलं की, “अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील ट्विटर बंदी मागे घेतली जाईल.”

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्विटरवर पुन्हा एकदा येणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षावर सुरु झाला आहे. अनेक मजेशीर मीम्स नेटकरी शेअर करत आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच एक सोशल मीडिया व्यासपीठ सुरु केलं आहे. या सोशल मीडिया अ‍ॅपचं नाव Truth Social असं ठेवण्यात आलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून ट्विटरपेक्षा अधिक मनमोकळेपणाने लोकं आपली बाजू मांडू शकतील, असा दावा करण्यात आला आहे.