अमेरिका-इराणमधील युद्धाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्याप या युद्धाबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. सध्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असल्यामुळे दोन्ही देशात युद्ध सुरू नाही, पण तणाव कायम आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला जलमार्ग होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये मोठा तणाव आहे. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केलेली आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या जहाजांच्या वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असल्याने जगातील अनेक देशांवर याचा मोठा परिणाम होत आहे.
दरम्यान, अमेरिका-इराणमधील शांतता करार आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा केला आहे. अमेरिका होर्मुझमधील नाकेबंदी तात्काळ हटवणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. तसेच इराणबरोबर शांतता कराराची देखील लवकरच घोषणा होणार असल्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सविस्तर पोस्ट शेअर करत भाष्य केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
“इराणने हे मान्य केलंच पाहिजे की ते कधीही अण्वस्त्र किंवा अणुबॉम्ब विकसित करणार नाहीत. होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ खुली केली पाहिजे, कोणताही टोल न आकारता. दोन्ही दिशेला जहाजांची वाहतूक अखंडितपणे सुरू राहील याची खात्री करणं आणि पाण्याखाली कोणतेही सुरुंग (बॉम्ब) असल्यास ते नष्ट केले जातील. (आम्ही आमच्या उत्कृष्ट पाण्याखालील सुरुंग शोधक जहाजांद्वारे स्फोट घडवून असे अनेक सुरुंग हटवले आहेत. मात्र, जे काही सुरुंग शिल्लक असतील ते इराणने तात्काळ नष्ट केले पाहिजेत, जे खूपच कमी असतील)”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीमधील नाकेबंदी हटवणार?
“आमच्या अद्भुत आणि अभूतपूर्व नौदलाच्या नाकेबंदीमुळे, जी आता (नाकेबंदी) उठवली जात आहे, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेली जहाजे पुन्हा घरी परतण्याची प्रक्रिया सुरू करू शकतात. तुमच्या लाडक्या राष्ट्राध्यक्षाकडून तुमच्या पत्नी, पती, आई-वडील आणि कुटुंबीयांना नमस्कार सांगा”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

“११ महिन्यांपूर्वी आमच्या शक्तिशाली ‘बी-२ बॉम्बर’ हल्ल्यामुळे तयार झालेल्या अक्षरशः कोसळलेल्या पर्वतांसारख्या भूभागावर आणि खोलवर गाडलेला तो संवर्धित पदार्थ, ज्याला कधीकधी ‘अणुधूळ’ (Nuclear Dust) म्हटलं जातं, तो अमेरिका इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताक आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निकटच्या समन्वयाने आणि सहकार्याने उकरून काढेल आणि नष्ट करेल”, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
इराणबरोबरच्या शांतता कराराची लवकरच होणार घोषणा?
“पुढील सूचना मिळेपर्यंत कोणत्याही पैशांची देवाणघेवाण होणार नाही. इतर खूप कमी महत्त्वाच्या बाबींवरही सहमती झाली आहे. अंतिम निर्णय घेण्यासाठी मी आता बैठक घेणार आहे”, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या शांतता कराराची लवकरच घोषणा होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
