Donald Trump Truth Social post: अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या ऐतिहासिक चर्चेच्या काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर एक अत्यंत सूचक पोस्ट शेअर केली आहे. “जगातील सर्वात शक्तिशाली रिसेट”, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या पोस्टमुळे जागतिक राजकारणात मोठ्या बदलांचे संकेत असल्याचे मानले जात आहे.

ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स इराणच्या शिष्टमंडळाशी वाटाघाटी करण्यासाठी इस्लामाबादकडे रवाना झाले आहेत. असे असताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी इस्लामाबादमध्ये या महत्त्वपूर्ण चर्चेला सुरुवात होणार आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, या चर्चेत अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वतः उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स करणार आहेत. दरम्यान, इराणविरुद्ध युद्धविराम जाहीर केल्यानंतर ट्रम्प यांनी हा अमेरिकेचा विजय असल्याचे म्हटले होते.

जेडी व्हान्स चर्चेसाठी रवाना

उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स इस्लामाबादकडे रवाना होण्यापूर्वी त्यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला. “पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता चर्चेकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहोत, इराणने भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करु नये”, असा इशारा व्हान्स यांनी दिला आहे. उपराष्ट्रपती जेडी व्हान्स अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत असून, त्यात व्हाईट हाऊसचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

इराणचे शिष्टमंडळ

इराणकडून या चर्चेसाठी कोण उपस्थित राहणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार,
इराणच्या बाजूने, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर कलिबाफ, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नवनियुक्त सचिव मोहम्मद बाकेर झोलकाद्र हे या चर्चेत सहभागी होणार असल्याचे म्हटले जाते. पाकिस्तानमध्ये होणारी चर्चा सकारात्मक होईल, अशी अपेक्षा व्हान्स यांनी व्यक्त केली आहे.

कोणत्या मुद्यांवर होणार चर्चा?

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्या दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याच्या अटीवर युद्धविरामाचा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. पाकिस्तनमध्ये होणाऱ्या वाटाघाटीत होर्मुझचा मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. तसेच, युरेनियमचे संवर्धन आणि अण्वस्त्र निर्मिती व युद्धात झालेली नुकसान भरपाई याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय इराण यावेळी लेबनॉनचा मुद्दा देखील उपस्थित करु शकते.