पीटीआय,दुबई

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’या आपल्या समाजमाध्यमावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा एक नकाशा प्रसिद्ध केला असून, त्यावर या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा उल्लेख ‘ट्रम्प स्ट्रेट’ असा केला आहे. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवून आठवड्याभरात हा जलमार्ग खुला करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर ट्रम्प यांची ही पहिली सार्वजनिक प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणने अमेरिकन नाकेबंदी उठवणे, इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंध शिथिल करणे आणि लेबनानसह युद्धबंदी लागू करणे या अटींवर हा मार्ग खुला करण्याची तयारी दर्शवली होती. या प्रस्तावावर अमेरिकन मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.

दरम्यान, इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर जागतिक नेत्यांची बैठक आणि त्यादरम्यान अमेरिकेसोबत झालेली अप्रत्यक्ष चर्चा आटोपून इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान न्यूयॉर्कहून तेहरानकडे रवाना झाले आहेत. आमसभेतील भाषणात त्यांनी ट्रम्प यांच्या इराण नष्ट करण्याच्या धमक्यांचा निषेध केला, मात्र कुटनीती आणि चर्चेचे मार्ग खुले असल्याचे स्पष्ट केले.

इस्रायली नागरिकांकडून पाण्याचे स्रोत हस्तगत

वेस्ट बँकेतील इस्रायली नागरिकांनी नैसर्गिक पाण्याचे झरे आणि वारसा स्थळांवर ताबा मिळवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. हे झरे पिण्याच्या पाण्यासाठी, पर्यटनासाठी आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि तेथे राहणार्‍या २८ लाख पॅलेस्टिनी लोकांसाठी ते अधिकाधिक दुर्गम होत आहेत. जॉर्डन व्हॅलीमध्ये एका ऑपरेटरने पॅलेस्टिनी गावाकडे जाणारी पाण्याची पाईपलाईन कापली आणि ती एका तलावाकडे वळवली.

सौदी अरेबियाकडून हुतींचा क्षेपणास्त्र हल्ला उधळला

येमेनमधील इराणसमर्थित हुती बंडखोरांनी डागलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केल्याचा दावा सौदी अरेबियाचे लष्करी प्रवक्ते, मेजर जनरल तुर्की अल-मल्की यांनी शनिवारी पहाटे केला. हे क्षेपणास्त्र खामिस मुशायत शहराच्या दिशेने डागण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. या वाढत्या हल्ल्यांचा गल्फ कोऑपरेशन कौन्सिलने तीव्र निषेध करत आंतरराष्ट्रीय समुदायाला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.