अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपवण्याच्या संदर्भात अद्याप देखील कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र, तरीही दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत अद्यापही युद्धाचे ढग गडद आहेत. अमेरिका आणि इराण युद्धाबाबत शस्त्रसंधीचा कालावधी याआधी दोनदा वाढवण्यात आलेला आहे. आता पुन्हा एकदा या शस्त्रसंधीचा कालावधी वाढण्यात येण्याची शक्यता आहे.
यातच दुसरीकडे शांतता करारही अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिका आणि इराणमधील हा संघर्ष संपवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या मध्यस्थीने चर्चा सुरू आहेत. तसेच हा शांततेचा करार मार्गी लागावा, यासाठी पाकिस्तान आणि कतारचे काही प्रतिनिधी इराणच्या दौऱ्यावरही आहेत. त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये लवकरच शांतता करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असं असतानाच आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण कराराबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अधिकाऱ्यांना या शांतता कराराच्या चर्चेत सावधगिरीने पुढे जाण्याचा सल्ला दिला. या कराराच्या वाटाघाटींमध्ये “कोणत्याही चुका होता कामा नये” आणि “करारासाठी कोणतीही घाई करू नये”, असा सल्ला डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांना दिला आहे. या संदर्भात ट्रुथ सोशलवर एक सविस्तर पोस्ट देखील ट्रम्प यांनी शेअर केली. त्यामुळे आता हा शांतता करार होणार की नाही? याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“आपल्या देशाने आजवर केलेल्या सर्वात वाईट करारांपैकी एक म्हणजे इराण अणुकरार, जो बराक ओबामा आणि त्यांच्या काळातील प्रशासनातील नवख्या अधिकाऱ्यांनी सादर करून अंमलात आणला होता. या करारामुळे इराण थेट अणुशस्त्रे विकसित करण्यापर्यंत पोहोचला. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाकडून इराणबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटी पूर्णपणे वेगळ्या आहेत. खरं तर, परिस्थिती अगदी उलट आहे. वाटाघाटी सुव्यवस्थित आणि विधायक पद्धतीने पुढे जात आहे आणि मी माझ्या प्रतिनिधींना सांगितलंय की त्यांनी कोणताही करार करण्याची घाई करू नये. कारण वेळ आपल्या बाजूने आहे. जोपर्यंत करार होत नाही आणि त्या कराराला मान्यता मिळत नाही, त्यावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत नाकेबंदी पूर्णपणे लागू राहील. दोन्ही पक्षांनी पुरेसा वेळ घेऊन हे काम योग्य पद्धतीने करावं”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

‘कराराच्या वाटाघाटीमध्ये चूक होता कामा नये’
“कराराच्या वाटाघाटींमध्ये कोणतीही चूक होता कामा नये. इराणबरोबरचे आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक व्यावसायिक आणि फलदायी होत आहेत. मात्र, त्यांनीही हे समजून घेतलं पाहिजे की ते अण्वस्त्रे किंवा अणुबॉम्ब विकसित करू शकत नाहीत किंवा मिळवू शकत नाही. मी मध्यपूर्वेतील सर्व देशांचे आतापर्यंतच्या त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल आभार मानतो. जे ऐतिहासिक ‘अब्राहम करारा’च्या राष्ट्रांमध्ये सामील झाल्यामुळे आणखी वाढेल आणि मजबूत होईल. तसेच कदाचित इराण इस्लामिक प्रजासत्ताक देखील यात सामील होऊ इच्छित असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
युद्ध लवकरच थांबणार? इराणची ‘एनरिच्ड युरेनियम’चा साठा सोडून देण्याची तयारी
पश्चिम आशियातील गेल्या अनेक महिन्यांपासून धुमसत असलेला संघर्ष संपवण्यासाठी एक महत्त्वाची घडामोड समोर आली. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेचा एक भाग म्हणून इराण आपल्याकडील अत्यंत घातक अशा ‘एनरिच्ड युरेनियम’चा साठा सोडून देण्यास तत्वतः तयार झाला आहे. ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने अमेरिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती संपवण्यासाठी आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग व्यापारासाठी पुन्हा खुला करण्यासाठी एक मोठा करार अंतिम टप्प्यात असल्याचं जाहीर केलं होतं. या घोषणेनंतर लागलीच इराण अण्वस्त्रांसाठी वापरता येण्याजोगे युरेनियम सोडून देण्यास तयार झाल्याची माहिती समोर आली आहे.
युरेनियम नष्ट कसं करणार? पेच कायम
अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इराणने युरेनियमचा साठा सोडण्याची तयारी दर्शवली असली, तरी हा करार सध्या प्राथमिक पातळीवर आहे. हा युरेनियमचा साठा कसा नष्ट करायचा, तो दुसऱ्या देशात कसा पाठवायचा की त्याची तीव्रता कमी करायची, याबाबतची नेमकी प्रक्रिया अजून ठरलेली नाही. मुख्य शांतता करार झाल्यानंतर पुढील टप्प्यातील अणुचर्चेत या तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
२०१५ च्या ‘ओबामा मॉडेल’चा वापर होण्याची शक्यता
इराणच्या या युरेनियम साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी २०१५ मधील ‘ओबामा कराराचा’ पर्याय वापरला जाऊ शकतो. बराक ओबामा यांच्या काळात इराणने आपला मोठा युरेनियम साठा रशियाकडे सोपवला होता. दुसरा पर्याय म्हणजे या युरेनियमची शुद्धता आणि तीव्रता इतकी कमी करणे, जेणेकरून त्याचा अणूबाँबसाठी वापरच करता येणार नाही. या करारांतर्गत इराणला आणखी एक मोठा फायदा होणार आहे. इराणचे परदेशात गोठवलेले अब्जावधी डॉलर्सचे फंड (Frozen Assets) मोकळे केले जातील. मात्र, इराणने अणू कराराचे नियम पाळत राहावे म्हणून, युद्धग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठीचा निधी हा अंतिम अणू करारावर स्वाक्षरी झाल्यानंतरच टप्प्याटप्प्याने रिलीज केला जाईल.
