डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे आणि आमचं ऐकलं नाही तर संपूर्ण इराण बेचिराख करुन टाकू, नागरिकांचाही विचार करणार नाही असं म्हटलं आहे. यावर आता इराणने प्रत्युत्तर दिलं आहे. सामान्य नागरिकांना अमेरिकेने लक्ष्य केलं तर आम्ही जो हल्ला करु तो सर्वात विनाशकारी हल्ला असेल हे अमेरिकेने लक्षात ठेवावं असं इराणने म्हटलं आहे. इराण काहीही झालं तरी झुकणार नाही हे लक्षात असू द्या असं चोख उत्तर ट्रम्प यांना देण्यात आलं आहे.

इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना काय उत्तर दिलं आहे?

इराणी लष्कराच्या प्रवक्त्याने टेलिग्रामवर एक निवेदन जारी केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की अमेरिकेने जर इराणी नागरिकांना लक्ष्य केलं तर आम्ही जे पाऊल उचलू ते विनाशकारी पाऊल असेल आणि व्यापक स्वरुपातला हल्ला असेल हे अमेरिकेने विसरु नये. दुसरीकडे इराणच्या संसदेचे स्पीकर मोहम्मद बाघेर घलिबफ यांनीही असं म्हटलं आहे की अमेरिकेने जर सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचं पाऊल उचललं त्यांनी हे लक्षात ठेवावं की अमेरिकेची अवस्था ही आम्ही नरकाप्रमाणे करुन टाकू. तुमच्या देशातल्या प्रत्येकाला हेच वाटेल की आपण या नरकात का राहात आहोत? एवढंच नाही तर त्यांनी असाही आरोप केला आहे की डोनाल्ड ट्रम्प हे नेत्यान्याहूंच्या सांगण्यावरुन सगळे इशारे देत आहेत, जे त्यांनी बंद केलं पाहिजे. इराणचं सरकारी ब्रॉडकास्टर आआयरबीने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा काय होता?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता पुन्हा एकदा धमकीवजा इशारा दिला आहे. आता शांतता करार झाला नाही तर संपूर्ण इराण बेचिराख करुन टाकू असं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणने युद्ध थांबवलं नाही तर आम्ही नागरिकांचा विचार करणार नाही. इराणच्या पायाभूत सुविधा आणि नागरी सुविधांवरही आम्ही हल्ला करु आणि संपूर्ण इराण उद्ध्वस्त करु असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “मंगळवारी पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे ठरेल. यापेक्षा दुसरं काहीही नसेल. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करा, अथवा तुम्ही नरकात जाल. तुम्ही पाहतच बसा” असंही ट्रम्प म्हणाले होते. ज्यानंतर आता इराणने उत्तर दिलं आहे.

आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे इराणच्या नागरिकांची सुरक्षा. जर त्यांना लक्ष्य केलं गेलं तर आम्ही अमेरिकेची अवस्था नरकापेक्षाही वाईट करु हे त्यांनी मुळीच विसरु नये असा इशारा घलिबफ यांनी दिला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर २८ फेब्रुवारीला हल्ला केला. त्यानंतर दोन आठवड्यात हे युद्ध संपवून टाकू असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. मात्र इराणने प्रत्युत्तरादाखल जे हल्ले केले त्यामुळे मागील पाच आठवड्यांपासून हे युद्ध सुरु आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केलं आहे. जगातलं २० टक्के कच्चं तेल ज्या मार्गातून जातं तो हा मार्ग आहे. त्यामुळे हा संघर्ष टीपेला पोहचला आहे.