US Airstrikes Irans Three Nuclear Sites: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच जाहीर केले की, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमधील तीन अणु प्रकल्पांना लक्ष्य केले. ट्रम्प यांनी शनिवारी सोशल मीडियावर लिहिले की, “आम्ही इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान येथील तीन अणु प्रकल्पांवर यशस्वी हल्ले केले आहेत.”

“सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीबाहेर आहेत. फोर्डो या प्राथमिक लक्ष्यावर संपूर्ण बॉम्ब पेलोड टाकण्यात आला आहे,” असे ट्रम्प यांनी आपल्या ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, “सर्व विमाने सुरक्षितपणे माघारी परतली आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन! जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे!”

याचबरोबर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, ते इराणमधील अमेरिकेच्या लष्करी कारवाईबद्दल व फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या तीन अणु प्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यांबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी शनिवारी स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता देशाला संबोधित करतील.

अमेरिका-इस्रायल समन्वय

इस्रायलचे सार्वजनिक प्रसार माध्यम कानने वृत्त दिले आहे की, “इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर केलेल्या हवाई हल्ल्यांदरम्यान इस्रायल अमेरिकेशी पूर्णपणे समन्वय साधून होते”, असे इस्रायली अधिकाऱ्याने म्हटले आहे.

इराणची प्रतिक्रिया

इराणच्या सरकारी इरणा वृत्तसंस्थेने रविवारी पहाटे, देशातील फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची कबुली दिली आहे. इस्फहान आणि नतान्झ अणुऊर्जा केंद्रांनाही या हल्ल्यांमध्ये लक्ष्य करण्यात आले, असल्याचे त्यात म्हटले आहे.

इस्फहानचे सुरक्षा प्रभारी अकबर सालेही यांनी सांगितले की, या प्रकल्पांभोवती हल्ले झाले आहेत. पण त्यांनी तपशीलवार माहिती दिली नाही.

हुथींनी दिली होती अमेरिकेला धमकी

तत्पूर्वी काल रात्री येमेनमधील हुथी बंडखोरांनी अमेरिकेला इस्रायल-इराण संघर्षात भाग न घेण्याची धमकी दिली होती. एका व्हिडिओ निवेदनात, हुथींनी म्हटले होते की, जर अमेरिकेने इस्रायलच्या इराणविरुद्धच्या संघर्षात भाग घेतला, तर ते लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जर अमेरिका इस्रायलसोबत इराणविरुद्ध हल्ला केला, तर सशस्त्र दल (हुथी) लाल समुद्रात अमेरिकेच्या जहाजांना आणि युद्धनौकांना लक्ष्य करतील,” असे या गटाचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी एका व्हिडिओ निवेदनात म्हटले होते.