अमेरिका-इराण यांच्यात दुसऱ्या फेरीची चर्चा येत्या तीन दिवसांत होऊ शकते असे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. या घडामोडी पुढील ३६ ते ७२ तासांत शक्य असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केल्याचे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ च्या वृत्तात म्हटले आहे. इराणने मात्र अमेरिकेच्या प्रस्तावाला कोणताही ठोस प्रतिसाद दिलेला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांनी होमुर्झ सामुद्रधुनीत अमेरिकी नाकेबंदी कायम ठेवत शस्त्रसंधीची मुदत वाढविली आहे. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही मुदत वाढवली असून, इराणच्या नेतृत्वाला चर्चेसाठी व्यापक प्रस्ताव तयार करण्यास वेळ मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. शस्त्रसंधीनंतरही या परिसरात युद्धझळा कायम आहेत. इराणने बुधवारी होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तीन जहाजांवर गोळीबार केला आणि त्यापैकी दोन जहाजे ताब्यात घेतली. यापैकी एक मालवाहू जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे जात होते.

इराण ठाम

चर्चेत सहभागी होण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी सांगितले. पहिल्या फेरीतील चर्चेत आम्ही चांगल्या भावनेने सहभागी झालो मात्र वाटाघाटी करणाऱ्यांकडे गांभीर्य नव्हते असा आरोप त्यांनी केला. युद्धविरामाची मुदतवाढ ही ट्रम्प यांची खेळी असू शकते, असे इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष महंमद कालिबाफ म्हणाले. युद्धविरामाला मुदतवाढ देण्यापूर्वी ट्रम्प यांनी हल्ल्याचे इशारे सातत्याने दिले याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

दोन जहाजे इराणच्या ताब्यात

होर्मुझच्या सामुद्रधुनीत तीन मालवाहू जहाजांवर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने गोळीबार केल्याची माहिती ब्रिटनच्या सागरी सुरक्षा संस्थेने दिली. या हल्ल्यामुळे युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लायबेरियाचा ध्वज असलेले ‘एपामिनोंडास’ आणि पनामाचा ध्वज असलेले ‘एमएससी फ्रान्सिस्का’ ही जहाजे रिव्होल्युशनरी गार्डने ताब्यात घेतली आहेत. ‘मरिन ट्रॅफिक’च्या जहाज ट्रॅकिंग डेटानुसार ‘एपामिनोंडास’ हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदराकडे जात होते. तिसरे जहाज ‘युफोरिया’चा ताबा घेतला नसला तरी त्यावर हल्ला करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी सैन्याने नाकेबंदी भेदून आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही इराणी तेलवाहू जहाजांना जप्त केल्यानंतर लगेचच हे हल्ले झाले आहेत. अमेरिकेने असाही दावा केला आहे की, या प्रदेशातील त्यांच्या सैन्याने इराणी बंदरांमधून बाहेर पडण्याचा किंवा आत शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे ३० जहाजांना मार्ग बदलण्यास भाग पाडले आहे. इराणने अमेरिकेच्या नाकेबंदीचा निषेध करत तिला ‘सशस्त्र चाचेगिरी’ आणि शस्त्रसंधीचा भंग असे म्हटले आहे.

तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ

होर्मुझ सामुद्रधुनी बंद आणि अमेरिका-इराण यांच्यातील शांतता चर्चेत कोणतीच प्रगती न झाल्याने त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर झाला. बुधवारी तेलाच्या किमती दोन टक्क्यांनी वाढल्या आणि आधीची घसरण भरून निघाली. ब्रेंट क्रूड १.७१ डॉलरने म्हणजेच १.७ टक्क्यांनी वाढून प्रति पिंप १००.१९ डॉलरवर पोहोचले आहे. शांतता काळात होर्मुझ सामुद्रधुनीतून जागतिक तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के वाहतूक होत असे. मात्र ही सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक इंधनसाखळी विस्कळीत झाली आहे. दरम्यान, रशियाने कझाक पाइपलाइनमधून जर्मनीला होणारी तेल निर्यात थांबवल्याची पुष्टी केली. हा तेलपुरवठा इतर मार्गांवर वळवला जाईल, असे रशियाने म्हटले आहे.