Donald Trump US Iran Talks: अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा उफाळलेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांनी करारावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. ट्रम्प यांनी यावेळी बोलताना इराणवर भीषण हल्ला करण्याचा विचार केला होता, असेही सांगितले. “हा हल्ला दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला ठरला असता आणि इराणसाठी तो विनाशकारी ठरला असता”, असे ट्रम्प म्हणाले.
इराणबरोबर वाटाघाटी सुरु – डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी एअर फोर्स वनमध्ये असताना पत्रकारांशी संवाद साधला. इराणबरोबर सोमवारपासून पुन्हा चर्चा सुरु होणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, करारासाठी मुदत निश्चित करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी यावेळी हल्ला करण्यापेक्षा संवादावर भर दिल्याचे नमूद केले. “इराणबरोबर वाटाघाटी सुरु आहेत. सोमवारी दुपारी चर्चा सुरु होईल, आणि पुढे बघुयात गोष्टी कशा जातात”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
भीषण हल्ला करण्याची केली होती तयारी
इराणबरोबर होणाऱ्या चर्चेत कोण सहभागी होणार? चर्चा कुठे होणार? याबाबत ट्रम्प यांनी खुलासा केलेला नाही. चर्चा सकारात्मक होईल असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. चर्चेबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, “मला आवडेल तसं करायला. अनेक लोकांचा जीव वाचेल.” हल्ल्याची भीषणता सांगताना, “विध्वंस एवढा भीषण असता की त्यांना पुन्हा सगळं उभं करायला खूप वर्ष लागतील”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. “इराणला आम्ही असं करावं असं वाटत नाही”, असेही ट्रम्प पुढे म्हणाले.
करारावर भर
अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा व्हावी यासाठी सौदी अरेबियाने मध्यस्थी केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. चर्चेला प्राधान्य देण्याचा आग्रह सौदीने केल्याचे त्यांनी नमूद केले. करारासाठी मुदतीवर बोलताना ट्रम्प म्हणाले की, “आमचा भर करार करण्यावर आहे. मला आणखी लोकांना मारायचं नाही, कारण लोकं मरतात, खूप लोकं मरतात आणि मला ते नको आहे.”
ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर देखील इराणसोबत करारासाठी मध्यपूर्वेतील देशांनी विनंती केल्याची पोस्ट केली आहे. यात त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा आग्रह देखील धरला केला आहे. अण्वस्त्र निर्मितीचा मुद्दा नमूद करत ट्रम्प यांनी इराणने लवकरात लवकर करार करावा असे स्पष्ट केले आहे.
