अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अमेरिका व इराण एकमेकांवर हल्ले करत आहेत. दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. कतार, पाकिस्तान आणि इतर काही देश अमेरिका आणि इराणला हा संघर्ष थांबवण्याचं आवाहन करत आहेत. मात्र, डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणला युद्धाच्या धमक्या देत असल्याने हा संघर्ष आणखी वाढत असल्याचं बोललं जात आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ८ जुलै रोजी एक वक्तव्य करत इराणवर पुन्हा एकदा मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती. ट्रम्प यांच्या त्या वक्तव्यानंतर जगात खळबळ उडाली होती. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराणमधील संघर्षाबाबत पुन्हा एकदा मोठं भाष्य केलं आहे.

‘इराणने चर्चेची तयारी दर्शवली आहे आणि अमेरिकेनेही इराणशी चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. मात्र, आता युद्धविराम संपलेलाच असेल’, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने आम्हाला चर्चा सुरू ठेवण्याची विनंती केली आहे. आम्ही देखील चर्चा करण्यासाठी होकार दिला आहे. मात्र, अमेरिकेने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की आता युद्धविराम संपलेला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ट्रम्प इराणवर का संतापले? काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत असलेली शस्त्रसंधी आणि सामंजस्य करार संपल्याची घोषणा ८ जुलै रोजी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी असा निर्णय का घेतला? याबाबत काही अहवालांच्या मते, टर्कीला जाण्याआधी ट्रम्प यांनी एक तातडीची बैठक व्हाईट हाऊसमध्ये घेतली होती. त्या बैठकीनंतर इराणबाबत ट्रम्प यांची भूमिका बदलली.

व्हाईट हाऊसमधील बैठकीत काय चर्चा झाली?

व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांची बैठक सोमवारी संध्याकाळी झाली होती. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि संरक्षण सचिव पेट हेगसेथ यांनी ट्रम्प यांना होर्मुझ सामुद्रधुनीबाबत माहिती दिली. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचे हल्ले सुरूच आहेत, असं ट्रम्प यांना सांगण्यात आलं होतं. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणने अँटी शीप क्रूज मिसाइलने हल्ला केला, तसेच जहाजांना ड्रोनने लक्ष्य केले, अशी माहिती रूबियो व हेगसेथ यांनी ट्रम्प यांना दिली. इराणने तीन जहाजांवर हल्ला केला. त्यातील एक जहाज नैसर्गिक वायू (एलएनजी) वाहून नेत होते, अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर हे ऐकून ट्रम्प यांचा संताप झाला. त्यांनी त्यांच्या सल्लागारांना विचारलं की, इराण युद्ध संपवण्यासाठी अंतिम करार करण्याच्या दिशेने सकारात्मकपणे वाटाघाटी करतोय का? ट्रम्प यांनी असा प्रश्न विचारल्यानंतर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. इराण सकारात्मक नसल्याचा निष्कर्ष ट्रम्प यांनी शेवटी काढला.