Donald Trump initiates aggressive hunt for leakers : इराणमध्ये अडकलेल्या वैमानिकाच्या बचाव मोहिमेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत खळबळजनक माहिती पत्रकारांना दिली. त्यांच्या सरकारमध्ये कोणीतरी गुप्तहेर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. इराणमधून अमेरिकन हवाई दलाच्या वैमानिकाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते. यावेळी त्यांनी दावा केला की, त्यांच्या प्रशासनातील एका अज्ञात व्यक्तीने अत्यंत संवेदनशील माहिती लीक केली, यामुळे बचाव मोहीम आणि संकटात सापडलेल्या अमेरिकन अधिकाऱ्याचा जीव धोक्यात आला होता. इराणमध्ये अमेरिकेचे F-15E विमान पाडल्यानंतर हा अधिकारी तिथे अडकला होता.
पत्रकारांनाही दिला इशारा
ज्या पत्रकाराने अमेरिकन सैन्य या अधिकाऱ्याचा शोध घेत असल्याचे वृत्त पहिल्यांदा दिले, त्या पत्रकाराने जर आपले स्रोत (sources) उघड केले नाहीत, तर त्याला कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली. “ज्या व्यक्तीने ही बातमी दिली, त्याने नाव न सांगितल्यास त्याला तुरुंगात जावे लागेल”, असं ट्रम्प म्हणाले.
गुप्त माहितीमुळे इराणला सुगावा लागला
ट्रम्प यांनी कोणत्याही विशिष्ट वृत्तसंस्थेचे नाव घेतले नाही, परंतु ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, ‘फॉक्स न्यूज’ आणि ‘एक्सिओस’ सारख्या संस्थांनी या घटनेचे वार्तांकन केले होते. ट्रम्प यांच्या मते, अत्यंत गोपनीय माहिती प्रसिद्ध झाल्यामुळे इराणच्या सैन्याला दुसऱ्या अमेरिकन सैनिकाच्या अस्तित्वाची कुणकुण लागली.
वैमानिकाला वाचवण्यासाठी १५५ विमानांचा वापर
या मोहिमेबद्दल माहिती देताना ट्रम्प म्हणाले की, या सैनिकाला शत्रूच्या सीमेतून बाहेर काढण्यासाठी १५५ विमानांचा वापर करण्यात आला. यात ४ बॉम्बर, ६४ फायटर जेट्स, ४८ रिफ्युलिंग टँकर्स आणि १३ बचाव विमानांचा समावेश होता. इराणी सैन्याची दिशाभूल करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर ‘छद्मयुद्ध’ (subterfuge) तंत्राचा वापर केला, जेणेकरून त्यांना त्या सैनिकाचे नेमके ठिकाण समजू नये.
वैमानिकाचे धाडस
विमान कोसळल्यानंतर जखमी झालेला अधिकारी घटनास्थळापासून दूर डोंगराळ भागात गेला होता. “तो मोठ्या प्रमाणावर रक्तबंबाळ झाला होता, तरीही त्याने डोंगराळ भाग पार केला आणि अमेरिकन सैन्याशी संपर्क साधून आपले स्थान कळवले”, असं ट्रम्प यांनी नमूद केले.
