Donald Trump US Midterm Elections Viral Memes : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशभरात डेमोक्रॅटिक पक्षाने महत्त्वाच्या जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅटिक पक्ष पुन्हा बहुमत मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. या निवडणूक निकालांचे पडसाद आता सोशल मीडियावरही उमटू लागले आहेत. ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाची खिल्ली उडवणारे मीम्स, आणि विनोदी प्रतिक्रिया एक्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. याबद्दलचे सविस्तर वृत्त इकोनॉमिक्स टाइम्सने दिले आहे.

‘अमेरिका ट्रम्प यांना देशाबाहेर पाठवण्याच्या तयारीत आहे’, अशा आशयाची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ट्रम्प यांच्या कठोर स्थलांतरविरोधी धोरणांचा संदर्भ देत एका युजरने ‘अमेरिका ट्रम्प यांच्या बहुमताने निवडून आलेल्या सरकारलाच देशाबाहेर पाठविण्याच्या तयारीत दिसते,’ अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीवर टोला लगावला. ट्रम्प यांच्या देशातून स्थलांतरित लोकांना हद्दपार करण्याच्या धोरणाची खिल्ली उडवण्यासाठी या पोस्टमध्ये ‘डेपोर्ट’ या शब्दाचा वापर करण्यात आला आहे.

‘अमेरिकेला आपले राहुल गांधी सापडले’

अमेरिकेतील राजकीय परिस्थितीची तुलना भारतीय राजकारणाशी करणारी पोस्टही चर्चेत आली आहे. एका युजरने ‘ अमेरिकेला आपले राहुल गांधी सापडले,’ अशी उपरोधिक टिप्पणी केली. निवडणुकीतील बदलत्या राजकीय समीकरणांवरून ट्रम्प यांच्यासह रिप्लुब्लिकन पक्षाला लक्ष्य करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या कामगिरीमुळे रिपब्लिकन पक्षासमोर आव्हान

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने काही महत्त्वाच्या लढतींमध्ये चांगली कामगिरी केली आहे. टेक्सास आणि दक्षिण कॅरोलिनासारख्या राज्यांत डेमोक्रॅट्सनी महत्त्वाची आघाडी मिळवल्याचे समोर आले आहे. ही निवडणूक राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कामगिरीवरील जनमत मानले जात होते. मात्र, वाढती महागाई, राहणीमानाचा खर्च आणि देशाच्या सद्यस्थितीबद्दलची नाराजी हे मुद्दे मतदानावर प्रभाव टाकणारे ठरल्याने रिपब्लिकन पक्षासमोर मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे.

निकालांवरून सोशल मीडियावर विनोदांची चर्चा

डेमोक्रॅटिक पक्षाची कामगिरी स्पष्ट होऊ लागल्यानंतर एक्सवर ट्रम्प यांच्या राजकीय भवितव्यावरून विनोद आणि मीम्सचा वर्षाव सुरू झाला. ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणांचा संदर्भ देणारी ‘ट्रम्प यांचे बहुमतच हद्दपार करण्याची वेळ आली’ या टिप्पणीला विशेष चर्चेचा सूर प्राप्त झाला.

मतमोजणी आणि निकालांचे अंदाज अद्याप सुरू असताना अमेरिकेतील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीवरून सोशल मीडियावर ट्रम्प यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात झाली आहे.