Donald Trump On US Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की, ते लवकरच व्यापार भागीदार असलेल्या देशांसाठी नवीन एकतर्फी व्यापार लागू करणार आहेत. याचबरोबर ज्या भागीदार देशांवर व्यापार शुल्क लागू करण्यात येणार आहे, त्यांना, “अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील”, याचेही स्पष्टीकरण देणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीतील त्यांच्या दौऱ्यादरम्यान उद्योगपतींशी झालेल्या बैठकीत बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमच्याशी एकाच वेळी १५० देश करार करू इच्छित आहेत, परंतु आम्ही इतक्या देशांकडे लक्ष देऊ शकत नाही. आमच्याशी भेटू इच्छिणाऱ्या सर्वांशी चर्चा करणे शक्य नाही”, असे वृत्त द गार्डियनने दिले आहे.
अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी…
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितेल की, कोषागार सचिव स्कॉट बेसेंट आणि वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्याकडे काही देशांना पत्राद्वारे नवीन व्यापार शुल्काची माहिती देण्याचे काम सोपवले जाईल. “पुढील दोन किंवा तीन आठवड्यांत एका विशिष्ट टप्प्यावर, मला वाटते की स्कॉट आणि हॉवर्ड संबंधित देशांना पत्रे पाठवून, अमेरिकेत व्यवसाय करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतल याची माहिती देतील.”
तत्पूर्वी एप्रिलच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या व्यापार शुल्क लागू केले होते, जे नंतर ९० दिवसांसाठी स्थिगित करण्यात आले होते.
पियुष गोयल करणार अमेरिका दौरा
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील एक भारतीय व्यापार शिष्टमंडळ पुढील आठवड्यात दोन्ही देशांमधील अंतरिम व्यापार कराराच्या रूपरेषांना अंतिम स्वरूप देण्यासाठी अमेरिकेला जाणार आहे, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ट्रम्प चर्चेत
गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण आहे. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. त्यानंतर ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाची एक्सवरून घोषणा केली होती. याचबरोबर त्यांनी काश्मीर बाबतही वक्तव्य केले होते. ज्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. पुढे काही दिवसांनी त्यांनी, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली नसून, त्यांना शस्त्रविरामासाठी मदत केल्याचे विधान केले आहे.