Trump Visa Policies: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकार आणि हार्वर्ड विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तेथे शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर, नोकरीच्या संधीच्या कमतरतेमुळे करिअरविषयी अनिश्चितताही निर्माण झाल्याचे भारतीय विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही दिवसांत ट्रम्प प्रशासन आणि हार्वर्ड विद्यापीठ यांच्यात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, नाव न सांगण्याच्या अटीवर, गेल्या महिन्यात हार्वर्ड केनेडी स्कूलमधून पदवीधर झालेला एक भारतीय विद्यार्थी म्हणाला की, “आम्ही काय करावे, आम्ही घरी परतावे की येथेच काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, हे समजेनासे झाले आहे.”
हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना गेल्या काही महिन्यांत ट्रम्प प्रशासन आणि विद्यापीठ यांच्यातील तणावामुळे त्यांच्यावर काय परिणाम झाला याचे अनुभव सांगितले आहेत.
हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ डिझाईनमधून दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर झालेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थिनीने सांगितले की, “विद्यार्थी अमेरिकन संस्थांमध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या आणि नंतर काही वर्षे अमेरिकेत नोकरी करण्याच्या हिशेबाने येतात.”
ही विद्यार्थिनी पुढे म्हणाली की, “या सर्व अनिश्चिततेसह, मी असे म्हणू शकते की नोकरी देताना बरेच लोक सामान्यतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांबद्दल संकोच करत होते आणि कदाचित हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतल्यामुळे काहींना नोकरी मिळण्यासाठी मदत व्हायची. परंतु सध्याची परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही.” याचबरोबर या विद्यार्थिनीने अमेरिकेतील गेल्या काही महिन्यांतील परिस्थितीचे वर्णन “रोलरकोस्टर” म्हणून केले आहे.
यावेळी हार्वर्ड केनेडी स्कूलमधील एक भारतीय विद्यार्थिनीने सध्याच्या परिस्थितीत नोकरी मिळवणे किती कठीण आहे, हे निदर्शनास आणून दिले. याचबरोबर ती नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, “कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या नोकरीबाबतच्या चर्चा थांबवल्या आहेत, विशेषतः हार्वर्डमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत. कारण आमच्या व्हिसाच्या स्थिती इतक्या अस्थिर आहेत की त्यामुळे आम्हाला नोकरी देण्यास कोणी इच्छुक नाही.”
याच वेळी अमेरिकेतच राहणार की भारतात परतणार, यावर बोलताना ही विद्यार्थिनी म्हणाली, “मला माहित नाही की मी भारतात परत जाईन, इथेच राहीन की एखाद्या दुसऱ्या कुठल्या देशात जाईन.”