Russia Ukraine War: रशियाशी सुरु असलेला संघर्ष लांबवण्याचा प्रयत्न युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की करत असल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. दुसरीकडे रशिया युद्ध समाप्त करण्यासाठी आग्रही असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. झेलेन्स्की यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी युक्रेन – रशिया संघर्षावर भाष्य केले. “रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध संपवायचे आहे, तर युक्रेनचे नेते हा संघर्ष लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प काय म्हणाले?

“आमची झेलेन्स्की यांच्याशी बैठक झाली, त्यांच्या भूमिकेतून विचार केला तर ही बैठक फारशी फलदायी नाही ठरली. आम्हाला शांतता हवीय, दहा वर्षांचे युद्ध किंवा उगाच खेळत बसायचं नाही. त्यांची भूमिका मात्र संघर्षाची आहे. आमचा प्रयत्न अनेक होणारे मृत्यू थांबवण्याचा आहे. गेल्या आठवड्यात दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. पुतिन यांना देखील हे युद्ध समाप्त करायचंय, झेलेन्स्कींना हे दहा वर्षे सुरु ठेवायचंय”, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांची ट्रुथ सोशलवरील पोस्ट

ट्रम्प यांनी यापूर्वी रशियाने नियंत्रण गमावले असल्याचा दावा केला होता. डिझेल तेल क्षेत्रातील नियंत्रण युक्रेनशी सुरु असलेल्या युद्धामुळे गमावल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. “डिझेल शुद्धिकरणाचे अनेक प्लांट उद्धवस्त करण्यात आले आणि सध्यातरी त्या कार्यान्वित नाहीत. संघर्ष शमण्याची चिन्हा दिसत नसणारे युक्रेन बरोबरचे युद्ध आता थांबायला हवं. सगळ्या जगाला त्रास होतोय, प्रत्येक महिन्याला २५,००० नागरिक विशेषत: सैनिकांचा मृत्यू होत आहे”, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहली आहे.

झेलेन्स्की काय म्हणाले?

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मात्र ट्रम्प यांच्याशी बैठक खूप काही बदलू शकते असा विश्वास व्यक्त केला आहे. ट्रम्प यांच्याशी चर्चा झाल्यानंतर झेलेन्स्की म्हणाले की, “न्यू यॉर्कमध्ये बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प तयार झाले आहेत. ही बैठक खूप काही बदलू शकते.” ट्रम्प यांनी किव येथे भेट दिल्याबाबत झेलेन्स्कींनी त्यांचे आभार मानले. युक्रेनमधील स्थितीवर सखोल चर्चा झाल्याचे झेलेन्स्कींनी सांगितले. शांतता हेच आमचे प्राधान्य आहे”, असे झेलेन्स्की म्हणाले. शस्त्रसंधी करुन सुरक्षा, उर्जा, अन्न सुरक्षा आणि नागरी सुरक्षेवर चर्चेला प्राधान्य असल्याचेही झेलेन्स्की म्हणाले आहेत.