Donald Trump vs Kamala Harris Debate: अमेरिकेत द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही असून निवडणुकीआधा डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार समोरसमोर येऊन ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ करतात. या वादविवादाच्या तीन फेऱ्या होतात. यंदा पहिली फेरी डेमोक्रॅटिक पक्षाचे माजी उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान जून महिन्यात झाली होती. पहिल्या फेरीत ट्रम्प वरचढ ठरले होते. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान चर्चेची दुसरी फेरी पार पडली.
एबीसी न्यूज या वृत्तवाहिनीने ही चर्चेची दुसरी फेरी आयोजित केली होती. मंगळवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी ९ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ६.३० वा) कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ९० मिनिटे विविध मुद्द्यांवर घमासान वादविवाद झाला. अर्थव्यवस्था, गर्भपाताचा हक्क, इस्रायल-गाझा आणि रशिया-युक्रेन युद्ध, स्थलांतरीतांचे प्रश्न यावर दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका हिरीरीने मांडली.
हे वाचा >> करवाढीवरून ट्रम्प-हॅरिस यांच्यात मतभेद
यावेळी ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षावर टीका करताना जो बायडेन हे अमिरेकच्या इतिहासातील सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष तर कमला हॅरिस या सर्वात वाईट उपाध्यक्ष असल्याचे म्हटले. तर प्रत्युत्तरादाखल कमला हॅरिस म्हणाल्या की, मला विश्वास आहे की, अमेरिकन नागरिकांना आपल्यातले वेगळेपण आणि साम्य काय आहे? याची उत्तम जाणीव आहे. आपण नवीन मार्ग शोधू शकतो का? हेही जनतेला माहीत आहे.
२१ जुलै रोजी जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्याऐवजी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवार घोषित करण्यात आले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी दोन्ही उमेदवारांदरम्यान होणारी ही चर्चा अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपणच अध्यक्षपदासाठी कसे योग्य आहोत, हे ठसविण्याचा आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या वाद-विवादाचा प्रभावी वापर केला जातो. पहिल्या फेरीत जो बायडेन हे वृद्धत्वामुळे काहीसे कमकुवत दिसले असले तरी आज दुसऱ्या फेरीत कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना तोडीस तोड चर्चा केली, असे बोलले जाते.
चर्चेच्या सुरुवातीला दोन्ही नेत्यांनी एकमेकांना भेटून स्मितहास्य करत हस्तांदोलन केले. मात्र त्यानंतर मुद्दे मांडत असताना त्यांची आक्रमकता, राग आणि वक्तृत्वामध्ये टीकेची धार दिसून आली. दोन महिन्यापूर्वी जेव्हा बायडेन आणि ट्रम्प यांच्यात चर्चा झाली, तेव्हा दोघांनीही एकमेकांना भेटून हस्तांदोलन करणे टाळले होते.
अमेरिकेसाठी ट्रम्प यांच्याकडे कोणतीही योजना नाही – हॅरिस
अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा पुढे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर गेली. ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हा देशात बेरोजगारी आणि नैराश्य पसरले होते. तसेच ट्रम्प यांच्या काळात करोना महामारीशी लढण्यात ते अपयशी ठरले होते. बायडेन सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ट्रम्प यांच्या चुका निस्तरल्या होत्या, असा आरोप कमला हॅरिस यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकन जनतेसाठी काहीही योजना नाहीत, असाही दावा हॅरिस यांनी केला.